पवई तलावातून झाली मगरीच्या पिल्लाची तस्करी; वन विभागाकडून कारवाई

    10-Jul-2024
Total Views |
powai crocodile



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
वन विभागाने पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करू पाहणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे (powai crocodile). बुधवार, दि. १० जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली (powai crocodile). आय.आय.टी पवई परिसरात हा आरोपी मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी आला होता. (powai crocodile)
 
 
पवई तलावात मोठ्या संख्येने मगरींचा अधिवास आहे. याठिकाणी मगरींचे नैसर्गिक प्रजनन देखील होते. यामधूनच जन्मास आलेल्या पिल्लाची तस्करी होत असल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. जोगेश्वरी लिंक रोडवर आय.आय.टी पवईच्या मार्केट गेट समोर एक व्यक्ती मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी वनकर्मचाऱ्यांनी 'डब्लूडब्लूए' स्वयंसेवकांसोबत त्याठिकाणी सापळा लावला. यावेळी बनावट ग्राहक तयार करण्यात आला. या बनावट ग्राहकाला मगरीचे पिल्लू विकण्यासाठी यश पारगावरकर नामक तरुण त्याठिकाणी आला. त्यावेळी लपलेले वनकर्मचारी आणि संस्थेच्या इतर स्वयंसेवकांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपासणीअंती त्याच्याजवळ मगरीचे एक पिल्लू आढळून आले. आरोपी यश हा महात्मा ज्योतीबा फुले नगर येथील राजरत्न चाळीमध्ये राहणारा रहिवाशी आहे.
 
 
 
या कारवाईमधून मगरीचे एक पिल्लू ताब्यात घेण्यात आले असले तरी, या भागात मगरीच्या पिल्लांची तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे. एका वनकर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक सर्पमित्राने मगरीचे हे पिल्लू यशला विकण्यासाठी दिले होते. अजून एका स्थानिक सर्पमित्राने पवई तलावामधून मगरीची पिल्लं पकडली होती. त्यामधील काही पिल्लं ही नाशिकमध्ये विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही स्थानिक सर्पमित्र सध्या फरार आहेत. वन विभाग त्यांच्या मागावर आहे. ही कारवाई वनक्षेत्रपाल राकेश भोईर, मानद वन्यजीव रक्षक, ठाणे रोहित मोहिते, वनपाला संदीप यमगर, वनरक्षक मिताली महाले, राम केंद्रे यांनी केली.