महाराष्ट्र पेटता ठेवण्यासाठी विरोधकांची आरक्षणासंदर्भातील बैठकीला दांडी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

    10-Jul-2024
Total Views |

आरक्षण  
 
मुंबई : महाराष्ट्रात दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकले असताना सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन, यावर तोडगा काढला पाहिजे, अशी आपली परंपरा आहे. परंतु, महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, या हेतूने विरोधी पक्षांनी आरक्षणासंदर्भातील बैठकीला दांडी मारली, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. 9 जुलै रोजी केला. मराठा आरक्षणासंदर्भात सह्यादी अतिथीगृहावर आयोजित बैठक संपल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. फडणवीस म्हणाले की, “मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली.
 
मात्र, मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीला वेळ नाही. ते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बसून विधान परिषद निवडणुकीची समीकरणे जुळवत आहेत. त्यामुळे एकप्रकारे आपली राजकीय जात कुठली, हे दाखवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.” महाराष्ट्रात दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकले असताना सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन, यावर तोडगा काढला पाहिजे, अशी परंपरा आहे. परंतु, दोन्ही समाजाशी खोटे बोलायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची असा यांचा हेतू दिसतो, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
 
फडणवीस म्हणाले, या बैठकीत अनेक नेत्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. त्याचवेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी सूचना केली आहे, की सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष, प्रत्येक राजकीय पक्षाकडून या प्रश्नावर लेखी म्हणणे मागवून घ्यावे. दुटप्पी भूमिका कोणाचीच असू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रात जातीय सलोखा टिकला पाहिजे, मराठा आरक्षण, सगेसोयरे यासंदर्भात जे-जे प्रश्न उभे राहिलेले आहेत, त्यासाठी एक लार्जर कन्सेसस तयार होऊन सकारात्मक तोडगा निघावा, यासाठी ही बैठक होती. समाज हिताचा निर्णय घेऊनच पुढे जाऊ, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
 
राजकीय पक्षांनी आपली भूमिका लेखी कळवावी!
 मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, दादाजी भुसे, अतुल सावे, धनंजय मुंडे यांच्यासह खासदार अशोक चव्हाण, सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, बच्चू कडू, भरत गोगावले, महादेव जानकर आदी उपस्थित होते.