नामांकित उद्योगपती विनय मराठे यांचे दुःखद निधन

    10-Jul-2024
Total Views |

उद्योगपती
ठाणे : महाराष्ट्रातील नावाजलेले उद्योगपती, मराठे इन्फोटेक प्रा. लि.चे संस्थापक विनय मराठे यांचे रविवारी सायंकाळी ठाण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई वसुधा मराठे, पत्नी वैशाली मराठे, मुलगी गौरी मराठे, मुलगा सुमुख मराठे, नात आणि जावई असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्या पार्थीवावर जवाहर बाग स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
विनय मराठे यांनी त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली मराठे इन्फोटेक ही कंपनी तीन दशकांपासून अधिक काळ चालवुन महाराष्ट्र आणि गुजरातातील औद्योगिक प्रगतीमध्ये विशेष योगदान दिले. कंपनीने महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरीच्या १९ आवृत्त्या आणि गुजरात इंडस्ट्रीज डिरेक्टरीच्या ८ आवृत्त्या प्रकाशित करून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आपली ठोस प्रतिमा प्रस्थापित केली. पुणे आणि अहमदाबाद येथील प्रादेशिक कार्यालये आणि व्यापक विपणन नेटवर्कच्या सहाय्याने, मराठे इन्फोटेकने या दोन्ही राज्यांमध्ये आपला विस्तार केला आहे.
 
श्री.मराठे यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने भौगोलिक विस्तार आणि लक्षणीय वाढ साधली. त्यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे महाटेक औद्योगिक प्रदर्शनाची निर्मिती झाली. सुरुवातीला डिरेक्टरी प्रकाशनावर लक्ष केंद्रित केल्यानंतर, मराठे इन्फोटेकने www.maharashtradirectory.com चे प्रक्षेपण करून ऑनलाइन कार्यक्षेत्रात प्रवेश केला, डिजिटल युगाला स्वीकारले आणि महाटेकद्वारे औद्योगिक सहकार्याला चालना दिली. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यात ते पुढाकार घेत असत.