वरळी हिट अँड रन प्रकरण! मुख्यमंत्री शिंदेंची राजेश शाहावर मोठी कारवाई

    10-Jul-2024
Total Views |
 
Rajesh Shah
 
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाचे वडील आणि शिवसेनेचे नेते राजेश शाह यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी कारवाई केली आहे. राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. बुधवारी याबद्दलचा पक्षादेश जारी करण्यात आला.
 
आरोपी मिहीर शाहाने वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ एका महिलेला कारखाली चिरडून पळ काढला होता. दरम्यान, त्याला मंगळवारी शहापूर येथून अटक करण्यात आली. रविवार, ७ जुलै रोजी पहाटे मिहीर शाह याने आपल्या बीएमडब्लू वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली होती. वरळी कोळीवाड्यातील रहिवासी असलेले हे दाम्पत्य ससून डॉकला मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली.
 
हे वाचलंत का? -  पवारांना जमिनी लुटण्याचा छंद!
 
धडकेनंतर मिहीर शहाने दुचाकीमागे बसलेल्या महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातापूर्वी मिहीर शाहाने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केले होते. त्यानंतर तो गोरेगावला आपल्या घरी गेला. तेथून पुढे कारच्या चालकासह लाँग ड्राईव्हवर निघाला. वरळी परिसरातून पुन्हा माघारी फिरत असताना हा अपघात घडला. त्यावेळी मिहीर स्वतः कार चालवत होता, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अपघातानंतर मिहीर शाहने पळ काढला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्याला मंगळवार, दि. ९ जुलै रोजी अटक करण्यात आली.
 
अपघात घडल्यानंतर मिहीरच्या वडीलांनी त्याला पळून जाण्याचा सल्ला दिला आणि ड्रायव्हिंग सीटवर चालकाला बसण्यास सांगितले. हा अपघात ड्रायव्हरने केला असे आपण सांगू, असे आरोपीच्या वडीलांनी म्हणजेच राजेश शाहा यांनी त्याला सांगितले. दरम्यान, आता राजेश शाहांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.