"भाजप सोडा अन्यथा आम्ही..."; पंजाबमधील भाजप नेत्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र

    10-Jul-2024
Total Views |
 Manjinder Singh Sirsa
 
चंदीगड : चंदीगडमधील भाजपच्या चार बड्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. हे चारही नेते पंजाबचे असून शीख आहेत. हत्येची धमकी देणारे पत्र चंदीगड येथील भाजप कार्यालयात पाठवण्यात आले असून, त्यासोबत काही ज्वलनशील पदार्थही सापडले आहेत. पत्रात भाजप नेत्यांना भाजप सोडा अन्यथा जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. पत्रात खलिस्तान आणि पाकिस्तान झिंदाबादचे नारे लिहिण्यात आले आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धमक्या मिळालेल्या भाजप नेत्यांमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मनजिंदर सिंग सिरसा, भाजप शीख समन्वय समिती आणि राष्ट्रीय रेल्वे समितीचे सदस्य तेजिंदर सिंग सरन आणि भाजपचे सरचिटणीस परमिंदर ब्रार यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीनिवासुलू यांचेही नाव आहे. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी याबाबत चंदीगड पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी पत्रात सापडलेले साहित्य तपासासाठी पाठवले आहे.
  
तेजिंदर सिंग सरन यांनी सांगितले की, ते या प्रकरणी पंजाब आणि चंदीगडच्या डीजीपींना भेटणार आहेत. भाजप नेते परमिंदर सिंग ब्रार आणि तेजिंदर सरन यांना लिहिले आहे की, आम्ही यापूर्वीही सोशल मीडिया पोस्टद्वारे तुम्हाला चेतावणी दिली होती की तुम्ही भाजपसोबत मिळून शीख आणि पंजाबच्या जनतेचा विश्वासघात करत आहात. आम्ही तुम्हाला यापूर्वीही इशारा दिला होता. तुम्ही एकतर भाजप सोडा नाहीतर आम्ही तुम्हाला या जग सोडण्यास भाग पाडू.
 
पत्रात लिहिले आहे की, “तुम्ही भाजपसोबत शेतकरी आंदोलन मोडून काढण्याचे काम केले. तुम्ही शीख धर्माचे देशद्रोही आहात. तुम्ही भाजपच्या मदतीने पंजाबमधील जनतेची दिशाभूल करत आहात आणि लोकांना भाजपमध्ये जाण्यास सांगण्याचा डाव आखत आहात. तुम्ही शीख आणि मुस्लिमांचे संबंध बिघडवण्याचे काम करत आहात.”
 
या पत्रात असे लिहिले आहे की, “आम्ही भाजपचे राज्य संघटनेचे सरचिटणीस श्रीनिवासुलू यांना लवकरच पंजाब सोडण्याचा इशारा देतो कारण आमचे त्यांच्याशी कोणतेही शत्रुत्व नाही पण आम्ही शिखांच्या गद्दाराला सोडणार नाही. खलिस्तान जिंदाबाद आहे आणि असाच राहील. पत्राच्या शेवटी खलिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद खलिस्तान जिंदाबाद फोर्स, हरदीप निज्जर जिंदाबाद, अवतार सिंग खांदा जिंदाबाद, परमजीत सिंग पंजवाड जिंदाबाद, मौलाना रहीम उल्लाह तारिक जिंदाबाद, पीर बशीर अहमद जिंदाबाद, मौलाना जीआर रहमान जिंदाबाद असे लिहिले आहे.