दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल आणि आपही आरोपी

ईडीतर्फे दोषारोपपत्र दाखल

    10-Jul-2024
Total Views |

arvinda kejriwal
 
नवी दिल्ली: दिल्लीतील मद्य धोरणातील घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राऊस एव्हेन्यू कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्रात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षालाही आरोपी केले आहे. आरोपपत्रात ईडीने अरविंद केजरीवाल यांचा घोटाळ्यातील किंगपिन आणि सूत्रधार म्हणून वर्णन केले आहे. गोव्याच्या निवडणुकीत लाचेच्या पैशाचा वापर झाल्याचीही माहिती असल्याचा दावा ईडीने केला आहे.
 
आरोपपत्रात अरविंद केजरीवाल आणि आरोपी विनोद चौहान यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचा तपशील देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये के कविता यांच्या पीएने विनोदच्या माध्यमातून आम आदमी पक्षाला गोवा निवडणुकीसाठी २५.५ कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे. न्यायालयाने मंगळवारी ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत केजरीवाल यांना १२ जुलैला समन्स पाठवले. मद्य धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. केजरीवाल हे सध्या सध्या तिहार तुरुंगात असून केजरीवाल त्यांना १२ जुलै रोजी वैयक्तिकरित्या हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले.