भारतीय क्रिकेटमध्ये 'गंभीर' युगाची सुरूवात; जय शाह यांनी केली मोठी घोषणा

    10-Jul-2024
Total Views |
 jay shah
 
मुंबई : टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या पदासाठी त्याच्या नावाचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरू होता. त्याने राहुल द्रविडची जागा घेतली आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच टी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकला. गौतम गंभीरच्या कामाची सुरुवात भारतीय संघांच्या श्रीलंका दौऱ्यापासून होईल, त्यानंतर या वर्षाच्या शेवटी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर पुढील वर्षी ५० षटकांचा विश्वचषक आहे.
 
गौतम गंभीरने खेळाडू म्हणून दोनदा विश्वचषक जिंकला आहे. २००७ च्या टी-२० विश्वचषकात आणि २०११ च्या फायनलमध्येही मॅच-विनिंग इनिंग खेळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. कर्णधार म्हणून त्याने दोनदा आयपीएल ट्रॉफीही जिंकली आहे. अलीकडेच केकेआरचा संघ त्याच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचा चॅम्पियन बनला. राहुल द्रविडचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांच्या नावाचा आधीच विचार केला जात होता, आता त्याला मंजुरीही मिळाली आहे.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. शाह यांनी ट्विट केले की, “भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आधुनिक क्रिकेट झपाट्याने बदलत आहे आणि गौतमने हे बदलते दृश्य जवळून पाहिले आहे. "त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अडचणींचा सामना केल्याने आणि विविध भूमिकांमध्ये चमकदार कामगिरी केल्याने, मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे."
 
टीम इंडियाचा प्रशिक्षक बनल्यानंतर गौतम गंभीरने X वर आपली प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, “भारत ही माझी ओळख आहे आणि माझ्या देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. मला परत आल्याचा अभिमान आहे. पण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हे माझे ध्येय नेहमीच राहिले आहे. मेन इन ब्लू १.४ अब्ज भारतीयांची स्वप्ने त्यांच्या खांद्यावर घेऊन आहेत आणि ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन!”