"मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला विरोधकांना वेळ नाही, पण वडेट्टीवारांच्या घरी..."; फडणवीसांचा घणाघात

    10-Jul-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : विरोधकांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही पण वडेट्टीवारांच्या घरी बसून निवडणूकीची बैठक घेण्यासाठी वेळ आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. मंगळवारी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतू, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे फडणवीसांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्वपूर्ण मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. पण अगदी ठरवून ऐनवेळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजे महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला. मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही. मात्र, वडेट्टीवारांच्या घरी बसून निवडणूकीची बैठक करण्यासाठी त्यांना वेळ आहे. त्यामुळे आपली राजकीय जात कुठली हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत."
 
"ज्यावेळी महाराष्ट्रात समाजासमाजात तेढ निर्माण झाली आहे, वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे आहेत, त्यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन मार्ग शोधले पाहिजेत अशी परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरिता दोन्ही समाजांमध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची अशा मानसिकतेतून विरोधी पक्षाने या बैठकीवर बहिष्कार घातला. याचा अर्थ त्यांच्यासाठी कुठलाच समाज महत्वाचा नाही तर त्यांना सत्ता आणि निवडणूकाच महत्वाच्या आहेत," अशी टीका त्यांनी केली.
 
ते पुढे म्हणाले की, "या बैठकीला विविध पक्षांचे नेते आले असून त्यांनी आपले मुद्दे मांडले आहेत. सर्व राजकीय पक्षांना सरकारने आपलं लेखी म्हणणं मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा प्रस्ताव बाळासाहेब आंबेडकरांनी मांडला आहे," असेही त्यांनी सांगितले.