ज्यांच्यामुळे शेकडो लोकांचे जीव गेले त्यांच्यासाठी महापौरांनी घातला कार्यक्रमाचा घाट!
01 Jul 2024 18:31:25
नवी दिल्ली : कॅनडामध्ये खलिस्तानी मुद्द्यावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. खलिस्तान्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल ३३१ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातील मुख्य खलिस्तानी तलविंदर सिंग परमार व हरदीप सिंग निज्जर या दोघांना श्रध्दांजली वाहण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कॅनडाच्या महापौर प्रभज्योत कौर यांनी पूर्ण पाठिबा दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कॅनडातील खलिस्तानी संघटनेकडून कॅलगरीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. खलिस्तानी तलविंदर सिंग परमार आणि हरदीप सिंग निज्जर यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात येणार असल्याची माहिती कॅनडाचे पत्रकार बेजिरहान मोचा यांनी आपल्या रिपोर्टद्वारे दिली आहे. हा कार्यक्रम खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिस आणि वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशनतर्फे प्रसिद्ध केला जाणार आहे.
विशेष म्हणजे कॅलगरीच्या महापौर प्रभज्योत कौर यांचे खलिस्तानी संघटनांशी संबंध असल्याचे कॅनडाचे पत्रकार मोचा यांनी वृत्त दिले आहे. तसेच, याच कारणास्तव कॅलगरी हे खलिस्तानींच्या कार्यक्रमासाठी योग्य ठिकाण बनले आहे, असेही सांगण्यात येत आहे. हा कार्यक्रम मार्टिनडेल, कॅलगरी येथील दशमेश कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. ज्या खलिस्तानी हल्ल्यात शेकडो लोकांचा जीव गेला त्याच खलिस्तान्यांना समर्पित कार्यक्रम करण्यास चक्क महापौरांनी पाठिंबा दिला आहे.