अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिका अॅक्शन मोडवर!

01 Jul 2024 19:44:05
bmc

मुंबई :
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेली कारवाई आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या विविध विभाग कार्यालयांने दि. २८ जून ते दि.३० जून दरम्यान केलेल्या कारवाईत ५३८ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई उच्च न्यायालय, चर्चगेट ते मुंबई उच्च न्यायालय, कुलाबा कॉजवे, मोहम्मद अली मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग, लालबागचा राजा परिसर, दादर रेल्वे स्थानक (पश्चिम, जोड (लिंक) मार्ग, हिल मार्ग, अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम), मथुरादास मार्ग, बोरिवली रेल्वे स्थानक (पश्चिम), कुर्ला रेल्वे स्थानक (पश्चिम) या परिसरातील फेरीवाल्यांच्या अनधिकृत कारवायांवर लक्ष ठेवले होते. तरी गेल्या तीन-चार दिवसात या परिसरातील ५३८ फेरीवाल्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 
Unauthorized hawkers and bmc news
 
विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत. फेरीवाल्यांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. तसेच आयुक्तांच्या निर्देशावरून पालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मोहिमेला वेग दिला आहे.

आयुक्तांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी

दरम्यान दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरात दि. १ जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अचानक भेट देवून पाहणी केली. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवरील निष्कासनाची कारवाई सुरु ठेवावी, वीजेच्या अनधिकृत जोडण्या आढळून येताच त्या तातडीने खंडीत कराव्यात, रेल्वे स्थानक परिसरातील कचरा निर्मूलन प्रभावीपणे करुन परिसर स्वच्छ ठेवावा, इत्यादी निर्देश देत त्यावर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी केली. आयुक्तांनी सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी असणारे प्रवाशी मार्ग, गाळे, तसेच संलग्न असणारे एम. सी. जावळे मार्ग, डॉ. डिसिल्वा मार्ग, रानडे मार्ग इत्यादी सर्व परिसरांमध्ये पायी फिरुन पाहणी केली.


 
Powered By Sangraha 9.0