एक पेड माँ के नाम’

नव्या अभियानाची घोषणा; निवडणुकीनंतर पहिले ‘मन की बात’ वृक्षारोपणमोहिमेच्या यशामुळे आनंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    01-Jul-2024
Total Views |

nartendra Modii
 
नवी दिल्ली : “सर्व देशवासीयांनी, जगातील सर्व देशांतील लोकांनी त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावावे,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच, “आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपणमोहीम झपाट्याने सुरू आहे, हे पाहून मला खूप आनंद होत आहे,” असेही ते म्हणाले. दरम्यान, ‘एक पेड माँ के नाम’ या नव्या अभिनयाची घोषणादेखील केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ’मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रविवार, दि. 30 जून रोजी देशवासीयांना संबोधित केले. लोकसभा निवडणुकीत विक्रमी तिसर्‍यांदा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला ’मन की बात’ कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्यांवर चर्चा करत असतात. त्यासोबतच देशवासीयांना विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठीसुद्धा प्रोत्साहित करत असतात.
केरळच्या वैशिष्ट्यपूर्ण छत्र्यांची ओळख
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला तुम्हाला केरळमध्ये बनवल्या जाणार्‍या खास प्रकारच्या छत्र्यांबद्दल सांगायचे आहे. खरेतर केरळच्या संस्कृतीत छत्र्यांचे विशेष महत्त्व आहे. छत्र्या हा तेथील अनेक परंपरा आणि विधींचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण, मी ज्या छत्र्यांबद्दल बोलत आहे, त्या ’कार्तुंबी छत्र्या’ आहेत. आणि त्या केरळमधील अट्टप्पाडी येथे बनवल्या जातात. मान्सूनच्या आगमनाबरोबरच आपल्याला छत्र्यांची आठवण होते. परंतु, केरळमध्ये विविध प्रकारच्या छत्र्या बनवल्या जातात, हे क्वचितच कोणाला माहीत असेल. अशा सुंदर छत्र्या बनवणे ही तेथील आदिवासी महिलांची मेहनत आहे,” असे त्यांनी सांगितले.
देशवासीयांचे मानले आभार
देशातील लोकशाही व्यवस्थेबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज मी देशवासीयांचे आभार मानतो की, त्यांनी आपल्या संविधानावर आणि देशाच्या लोकशाही प्रणालींवरील अतूट विश्वासाचा पुनरुच्चार केला आहे. 2024 सालची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. मी निवडणूक आयोगाचे आणि मतदानप्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो.”
पॅरिस ऑलिम्पिकबाबत भाष्य
“पुढील महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक या वेळेपर्यंत सुरू झाले असेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “मी भारतीय संघाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. टोकियो ऑलिम्पिकच्या आठवणी आजही आपल्या सर्वांच्या मनात ताज्या आहेत. टोकियोमधील आमच्या खेळाडूंच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले होते, तेव्हापासून आमचे खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त होते. नेमबाजीत आमच्या खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघ टेबल टेनिसमध्ये पात्र ठरले आहेत. आमच्या नेमबाज मुलींचाही भारतीय शॉटगन संघात समावेश आहे,” असेही ते म्हणाले.
दि. 30 जून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा
मोदी म्हणाले की, “दि. 30 जून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले आदिवासी बांधव हा दिवस ‘हुल दिवस’ म्हणून साजरा करतात. हा दिवस परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणार्‍या शूर सिद्धो-कान्हूंच्या अदम्य धैर्याशी संबंधित आहे. शूर सिद्धो-कान्हूंनी हजारो संथाली कॉम्रेड्सना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध 1855 साली दातखिचीत लढा दिला. म्हणजे 1857 साली भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दोन वर्षे आधी, जेव्हा झारखंडच्या संथाल परगणा येथील आपल्या आदिवासी बांधवांनी परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध शस्त्रे उचलली होती.”
अराकू कॉफीला अनेक जागतिक पुरस्कार
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जेव्हा आपण व्होकल फॉर लोकलबद्दल बोलतो, तेव्हा अराकू कॉफीबद्दल बोलणेदेखील महत्त्वाचे आहे. यावेळी पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. विशाखापट्टणममध्ये मुख्यमंत्र्यांसोबत ही कॉफी चाखण्याची संधी मला मिळाली. अराकू कॉफीला अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. जी-20 शिखर परिषदेतही ही कॉफी लोकप्रिय झाली होती,” असे त्यांनी सांगितले.
वृक्षारोपण मोहिमेबाबत आनंद व्यक्त
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आयुष्यात ‘आई’ला सर्वोच्च स्थान आहे, हे लक्षात घेऊन यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेचे नाव ‘एक पेड माँ के नाम’ असे आहे. मी माझ्या आईच्या नावाने एक झाड लावले आहे. जगातील सर्व देशांतील लोकांनी आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावावे आणि तिच्या स्मरणार्थ किंवा तिच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले जावे,” असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “पृथ्वीही आपली आईप्रमाणे काळजी घेते. म्हणून पृथ्वीमातेची काळजी घेणे, हे आपले कर्तव्य आहे. तुमच्या आईच्या नावाने एक झाड लावून तुम्ही तुमच्या आईचा सन्मान तर करालच, पण पृथ्वीमातेचे रक्षणही कराल,” असेही त्यांनी सांगितले. “मी सर्व देशवासीयांना, जगातील सर्व देशांतील लोकांना त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन केले आहे.” पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आईच्या स्मरणार्थ किंवा तिच्या सन्मानार्थ वृक्षारोपणमोहीम झपाट्याने सुरू आहे, हे पाहून खूप आनंद होत आहे.”