‘मोदी 3.0’ची ऐतिहासिक सुरुवात

    09-Jun-2024
Total Views |
third term modi govt nda bharat
 
आजमितीला संपूर्ण जगात अनेक देश भारताकडे एक विश्वासू साथीदार म्हणून पाहात आहेत. नरेंद्र मोदींच्या यांच्यामुळेच ही नवी ओळख भारताला मिळाली आहे. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात रालोआने तिसर्‍यांदा सत्ता संपादित करून तिसर्‍या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात केली आहे.

सलग तिसर्‍यांदा ’रालोआ’ सरकारने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला फक्त राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय महत्त्वही आहे. गेल्या कित्येक दशकांत कडबोळ्या सरकारांमुळे आलेल्या, देशातील राजकीय अस्थिरतेला मोदी यांनी स्थैर्य दिले. आजमितीला संपूर्ण जगात अनेक देश आणि जागतिक नेते, भारताकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक विश्वासू साथीदार म्हणून पाहात आहेत. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच ही नवी ओळख भारताला मिळाली आहे.

काल सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआला मिळालेला नवा जनादेश, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला नक्कीच मोठ्या भूमिकेसाठी नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अटलजींच्या काळापासून रालोआची परंपरा सर्वांचा सहभाग, सहकार्य आणि सहमतीने ‘सबका साथ - सबका विकासा’चीच राहिली आहे. येत्या पाच वर्षांतही भाजपसह रालोआच्या सर्व मित्रपक्षांनी, राष्ट्र उभारणीत मोदींच्या नेतृत्वाखाली विकास आणि कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे. याची झलक शुक्रवारी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या रालोआच्या बैठकीत पाहायला मिळाली. तेथे रालोआच्या सर्व प्रमुख मित्रपक्षांनी, मोदींच्या नेतृत्वातल्या रालोआ सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळावर केवळ समाधानच व्यक्त केले नाही, तर पुढील काळात पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा शब्ददेखील दिला आहे.

खरेतर 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, संपूर्ण आघाडीला ‘राष्ट्र सर्वोपरि’ तत्त्वावर पुढे जायचे आहे. या दृष्टिकोनातून येत्या काळात नक्कीच मोठे आणि कठोर निर्णय घेतले जातील. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच बिहारचे नितीश कुमार, आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांच्यासारखे नेतेही, आपापल्या राज्यात सुशासनासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा पंतप्रधानांनाही होईल, यात तीळमात्र शंका नाही.

2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत आलेल्या निकालाने, भारतीय लोकशाहीची ताकद, निष्पक्षता आणि पारदर्शकता सिद्ध केलीच आहे. ईव्हीएममध्ये हेराफेरी होत असल्याचा निराधार अपप्रचार करणार्‍या, विरोधकांना हा निकाल म्हणजे एक मोठी चपराक आहे. या निवडणुकीत आलेल्या जनादेशाने आजही ‘ब्रँड मोदी’ यांचा प्रभाव कायम असल्याचे सूचित केले आहे. 2024च्या जनादेशाने भाजप, मोदी आणि रालोआ, यांच्यावरील देशातील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित केला आहे. हा विजय करोडो कार्यकर्त्यांचा, मतदारांचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा विजय आहे. हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे, ज्यात ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हे भारतीय तत्वज्ञान आहे. प्रत्येक लोकशाहीच्या इतिहासात एक ऐतिहासिक टप्पा येतो, जो देशाचे धोरण आणि भवितव्य ठरवतो. लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या निकालात, मोदींच्या नेतृत्वाखाली रालोआचा तिसर्‍यांदा झालेला विजय हा नक्कीच एक ऐतिहासिक क्षण आहे. या निवडणुकीतील विजयाने अनेक सकारात्मक संदेश दिले आहेत.

इतिहासाची पाने चाळली तर सहज लक्षात येईल की, 1962 नंतर पहिल्यांदाच एका नेत्याला सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची संधी जनतेने दिली आहे. तसेच, पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी चारवेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन ,गुजरातचा यशस्वी कारभार पाहिला होता, हादेखील एक इतिहासच आहे. पंतप्रधान मोदींच्या दहा वर्षांच्या प्रयत्नांचे, चिकाटीचे आणि विकासाभिमुख राजकारणाचे हे फलित आहे की, अनेक खोट्या प्रचारानंतरही विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भारतीय जनता पक्षाच्या पुढे जाऊ शकली नाही. 60 वर्षांपेक्षा अधिक काळ देशावर राज्य करणार्‍या काँग्रेसला, 100 जागांचा आकडाही पार करता आला नाही. जनतेने विरोधी आघाडीला पूर्णपणे नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. येणारा काळ हा धर्म, जात, पंथ, जातीयवादाचा नसून विकासाच्या आणि हिताच्या राजकारणाचा आहे, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींची विशेष बाब म्हणजे, त्यांची ‘राष्ट्र प्रथम’ ही विचारसरणी, आणि समाजात शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या देशातील प्रत्येक नागरिकाप्रती असलेली संवेदनशीलता. एकीकडे विरोधकांनी धर्म आणि जातीच्या आधारे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, तर पंतप्रधान मोदींनी विकास आणि कल्याणकारी योजनांचा लाभ, समाजातील शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आता भाजप आणि रालोआचा देशाच्या कानाकोपर्‍यात जोरदार विस्तार होत आहे. ओडिशा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, तामिळनाडू आणि केरळमध्येही पक्षाच्या मतांची टक्केवारी झपाट्याने वाढली आहे.

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींनी ज्या जिद्दीने आणि राजकीय इच्छाशक्तीने देशाला जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आणले आहे, ते स्वतःच एक या इच्छाशक्तीचे अद्भूत उदाहरण आहे. याच इच्छाशक्तीने देशाला आर्थिक आघाडीवर पुढे नेण्यासाठी शुक्रवारी सेंट्रल हॉलच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना मोठ्या विदेशी गुंतवणुकीसाठी साधी आणि सरळ धोरणे बनवण्याचा संदेश दिला आहे. जेणेकरून भविष्यात देशात गुंतवणूक करू इच्छिणार्‍या परदेशी कंपन्यांना देशातील प्रत्येक राज्यात व्यवसायवाढीसाठीअनुकूल वातावरण निर्माण होईल आणि प्रत्येक राज्यात गुंतवणुकीबरोबरच तरुणांसाठी रोजगाराच्या संधीदेखील निर्माण करता येतील.
 
पवन त्रिपाठी