राज्यातून तीन नवे चेहरे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात, राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा!

    09-Jun-2024
Total Views |
modi government minister oath
 


मुंबई :       केंद्रात तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्ता स्थापन करणार असून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ७:१५ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, पंतप्रधानांसोबतच मंत्रीपदाकरिता शपथ देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून मंत्रिपदी कुणाची वर्णी लागली आहे याबाबत जाणून घेऊयात.

पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची वर्णी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लागली आहे. खा. मुरलीधर मोहोळ यांनी नेमकं कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुण्याचे महापौर राहिलेले मोहोळ आता केंद्रात मंत्रीपद भूषविणार आहेत. एकंदरीत, मोहोळ याच्या रुपाने राज्याला मंत्रीपद मिळणार हे निश्चित झाले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे या मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे. दरम्यान, रक्षा खडसे यांनी सरपंच ते खासदार असा राजकीय प्रवास केला असून आता त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनादेखील मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रतापराव जाधव यांच्या निवडीमुळे एनडीएचा घटक पक्ष व राज्यातील महायुतीचा घटक पक्ष शिवसेना(शिंदे गट) यांना एक मंत्रीपद मिळणार आहे. राष्ट्रपती भवनात प्रतापराव जाधव यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे.
 
दरम्यान, मोदी सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक असलेले नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर, भाजप खा. पियुष गोयल व राज्यमंत्री रामदास आठवले यांनादेखील मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत, राज्यातून सहा खासदारांची वर्णी मंत्रीपदी होणार असून राष्ट्रपतींकडून त्यांना मंत्रीपद व गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे.