हिंदुत्व हा राष्ट्रीय भावना निर्माण करणारा विचार - दिलीप करंबेळकर

स्वा. सावरकर यांच्या नातवंडाच्या उपस्थितीत ठाण्यात दोन पुस्तकांचे प्रकाशन

    09-Jun-2024
Total Views |
hinduism dilip karambelkar
 

ठाणे :      हिंदुत्व हा समाजामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणारा विचार आहे, किंबहुना हिंदु म्हणुन जगासमोर एकत्व, विशिष्टत्व, चैतन्यत्व या तिन्ही बाबीमुळे समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याची क्षमता आहे. असे परखड मत विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी मांडले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे लेखक जयेश मेस्त्री आणि सावरकरवादी विचारवंत लेखक अक्षय जोग यांच्या "दुर्लक्षित हिंदुहितवादी- व्यक्ती, संस्था, चळवळी" तसेच, "सावरकर : सकारात्मक विचारांची गुरुकिल्ली" या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सावरकरांचे नातू सात्यकी अशोक सावरकर आणि नात असिलता सावरकर - राजे, लेखक अक्षय जोग, लेखक जयेश मेस्त्री तर श्रोत्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, डॉ. राजलक्ष्मी वालावलकर, डॉ.राहुल कुलकर्णी, विक्रम दिवाण आदि उपस्थित होते. याच सोहळयात शांताबाई सावरकर उद्योजिका अर्थसहाय्य योजनेचा प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्यानंतरच्या घडामोडींचा आढावा घेत अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी, भारताचा सुसंगत इतिहास मांडण्याची गरज आहे, सावरकर हे त्यातील महत्वाचा बिंदू आहेत. तेव्हा,प्रत्येकाला सावरकरांचे आकलन व्हायलाच हवे. असे स्पष्ट करून त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाचे अनेक पैलु उलगडले.धार्मिक हिंदु समाजाला राष्ट्रीय हिंदु बनवायचे असुन समाजात राष्ट्रवादाची भावना रुजवण्यासोबतच हिंदु म्हणुन जगासमोर एकत्व, विशिष्टत्व, चैतन्यत्व निर्माण करावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या निकालावर भाष्य करताना, त्याकाळी काँग्रेससमोर कोणतेच आव्हान नव्हते, त्यामुळेच नेहरूंना तीन वेळा पंतप्रधान होता आले.त्या तुलनेत आजचे राजकारण स्पर्धात्मक असताना तसेच सगळ्या राष्ट्रीय - आंतराराष्ट्रीय शक्ती विरोधात एकवटल्या असताना नरेंद्र मोदी तीन वेळा पंतप्रधान होत आहेत. हे विशेष असल्याचे सांगितले. दरम्यान, १२५ वर्षानंतर प्रगल्भ हिंदुत्वाचे विचार पोहचवण्याचे काम आज होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून अक्षय जोग यांनी स्वा. सावरकर यांच्यासह थोर क्रांतीकारकांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतला.
 
हिंदु हितवाद दुर्लक्षित होता नये...

हिंदु हितवाद दुर्लक्षित केला तर काय होते. हे आपण आताच्या निवडणुक निकालात अनुभवतोय. तेव्हा, हिंदुंनी सजग राहायला हवे,आपल्या आजुबाजुला हातपाय पसरणाऱ्या धर्मांध शक्तींना प्रत्येकाने रोखायला हवे. तसेच जातीपातीत न विभागता सर्व हिंदुचे एकत्रिकरण होणे गरजेचे आहे, आपल्यातील जातीभेद निवळायला सण उत्सव महत्वाचे आहेत.असे प्रतिपादन सात्यकी सावरकर यांनी केले.