हरहुन्नरी अश्विनी

    09-Jun-2024   
Total Views |
ashwini shah



नोकरीपासून व्यवसायापर्यंत आणि नाशिकपासून इजिप्तपर्यंतचा रोमहर्षक सोलो प्रवास करणार्‍या हरहुन्नरी अश्विनी शहा यांच्याविषयी..

माणूस जन्माला येताना काही स्वप्न घेऊन येतो, काही इच्छा घेऊन येतो. त्या पूर्ण करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य. तर काही माणसे उद्दिष्ट न घेता येतात. त्यांच्या इच्छ सुप्तावस्थेत असतात, आणि आयुष्य जगता जगता ते त्यांचा शोध घेतात. आपल्या स्वप्नांचा, इच्छांचा हा आत्मशोध. शोध कोणाला चुकलाय? या अश्विनीची गोष्टही अशीच. नाशिकमध्ये आपल्या आईबाबा आणि भावासोबत तिचे बालपण गेले. लहान असतानाच आपण ठरवतो ना, आपल्याला मोठे होऊन कोण व्हायचे आहे ते? खरेतर ज्यांच्याकडे मर्यादित कला-गुण असतील, त्यांच्याकडे मर्यादित पर्यायसुद्धा असतात. पण जे सर्वगुणसंपन्न आहेत, ज्यांच्या आकांक्षा मोठ्या आहेत, आणि पंखात बळ भरण्याजोगे आईवडील सोबत आहेत, त्यांच्यासाठी अवघे आयुष्य म्हणजे एक प्रयोगशाळाच! जे कराल, ते उत्तम जमते. अश्विनीची शाळा संपली आणि महाविद्यालयासाठी तिने नाशिकचा निरोप घेत डोंबिवली गाठले. आयटी हा तिचा विषय. काही दिवस नोकरीसुद्धा केली.
 
पण मग नोकरीच्या मर्यादा जाणवू लागल्या. नेहमीच्या वेळी उठणे, आवरून कामासाठी जाणे, काम झाल्यावर घरी येणे. पुन्हा दुसरा दिवस. नोकरीपेक्षा स्वतःचे काहीतरी सुरू करावे, असे वाटले. तिने एमबीएसाठी प्रवेश घेतला. यापूर्वी तिने एका शिक्षण संस्थेतही नोकरी केली होती. ही नोकरी घरच्यांना आवडलीही होती. पण तिची स्वप्न? त्यांची भरारी मोठी! या अभ्यासक्रमामधे केवळ थियरी नव्हती, तर नाशिकमध्ये विविध प्रकारचे असाईनमेंट्स आणि सर्वेक्षण यानिमित्ताने तिने केले. त्यातून तिला स्वतःबद्दल कळू लागले. अशातच तिच्या एका वरिष्ठ सहकार्‍याकडून तिला समजले, ती विपणन क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकते. एमबीए मार्केटिंगमधून करायचे तिने ठरवले. मार्केटिंग तिला उत्तम जमू शकते, हे समजल्यावर एक वाट दिसली. त्यानंतर कॅम्पस मुलाखतीत एका चांगल्या बँकेत तिला संधी मिळाली. या बँकेत अश्विनीने काही काळ काम केले. परंतु, पुन्हा तीच अस्वस्थता सतावू लागली. नोकरी करण्यासाठी एमबीए तिने नक्कीच केले नव्हते. त्यातच तिचे एमबीएच्या आधीचे सर्व शिक्षण ज्या क्षेत्रात झाले, त्या क्षेत्राशी तिचा संपर्क तुटला होता. आता काय करावे? ही अशी बेचैनी माणसाला ऊर्जा प्रदान करते. अशातच एक नवी नोकरी चालून आली, ज्यात तिच्या आवडीचे काम आणि तिचा अभ्यासाचा विषय असे दोन्ही होते.
 
एक आयटी कंपनीत मार्केटिंगची संधी. तिच्या आयुष्याला कलाटणी मिळली ती येथेच. तिचा पती तिला येथेच भेटला. त्याचीच कंपनी होती ती. या नोकरीत आणि सोबतीत ती सर्वार्थाने फुलू लागली, खुलू लागली. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हीच वेळ आहे, असे हर्षिल म्हणाला. तिच्यासाठी हा अतिशय मोलाचा सल्ला होता. पैसे जमवू आणि मग व्यवसायाचा विचार करू असे शक्य नाही, असे त्याने तिला सांगितले. लग्नाच्या आधीच तिने नोकरी सोडली. ही अचाट निर्णयक्षमता आणि जोडीदारावरचा आणि स्वतःवरचा विश्वास. घरच्यांना तिचा हा निर्णय काहीसा अमान्य होता. लेक शिक्षणक्षेत्रात नोकरी करत होती, तेव्हाच कसे छान होते. दुपारपर्यंत घरी येत होती. असे तिचे बाबा तिला वरचेवर म्हणत. पण आता मात्र तिच्या व्यवसायासाठी ते स्वतःही खुश आहेत.

सुरुवातीला अश्विनीने कागदी पिशव्यांचा व्यापार सुरू केला. पण प्लॅस्टिक सर्रास वापरले जाण्याचा काळ होता तो. ते स्वस्तही मिळायचे, आणि त्यावर बंदीही नव्हती. कागदी पिशव्यांचा गाशा लवकरच गुंडाळला गेला. कॉर्पोरेट गिफ्टिंगची नवी संकल्पना अश्विनीच्या डोक्यात घोळू लागली होती. सुंदर दिसतील असे गिफ्ट बॉक्सेस तयार करायचे. एखाद्या सणाच्या दिवशी, किंवा एखाद्या खास दिवशी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना भेटवस्तु देते. ’गिफ्ट बड्स’ हा व्यवसाय सुरू झाल्यावर तेच तिचे विश्व झाले. एक व्यावसायिक म्हणून आता तिचे व्यावसायिक वर्तुळात, नाव होऊ लागले. यातच एक मोठी ऑर्डर आली आणि तिने ठरवले, तिचे एकटीने कोठेतरी जाण्याचे स्वप्न पूर्ण करायचे. बालपणापासून तिने मीना प्रभू यांची प्रवासवर्णने वाचली होती. त्या एकट्याच प्रवास करत. कोणत्याही एका शहरात जाऊन दीर्घकाळ वास्तव्य करत. तिलाही तसेच काहीसे करायचे होते.

आजवर ती कधी विमानातसुद्धा बसली नव्हती, किंवा एकटी कोठे फिरायलासुद्धा गेली नव्हती. आणि समोर होता एक देश. इजिप्त. एका मित्रानेच तिला 12 दिवसांचे वेळापत्रक बनवून दिले. नवर्‍याचे पूर्ण पाठबळ, आणि अदम्य आत्मविश्वास जोडीला. तिच्या या इजिप्त प्रवासवर्णनाची लेखमालिका फेसबुकवर गाजली. आता लेखिका म्हणूनसुद्धा तिला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून ओळख मिळू लागली. काहीशी अबोल पण नव्या अनुभवांना सामोरे जाण्यासाठी उत्सुक असा तिचा स्वभाव. कुतूहल आणि बुद्धिमत्ता जन्मजात मिळाले की, माणसे केवळ यशस्वीच होत नाहीत, तर प्रगल्भसुद्धा होतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अश्विनी. नवख्या देशात, सोबतीला माणसे नसताना, एकटीने सर्व करावयाचे. हातात आपला म्हणावा असा केवळ फोन, जोडून दिलेली माणसेही अनोळखी. पण यातूनच ती घडत गेली.
 
एक विशेष आठवण यानिमित्ताने ती सांगते. तिचा विपश्चनेचा अनुभव. रात्रीचे जेवण नाही, आणि कोणाशी बोलायचे नाही, पहाटे उठून ध्यान करायचे, हे सर्वच तिच्यासाठी नवे होते. तिची लिहिण्याची पद्धतही खुमासदार असल्याने, वाचकांच्या मनाचा लगेच ताबा घेते. एखाद्याला गोष्ट सांगावी, तसे तिचे लेखन आहे. ’गिफ्ट बड्स’ला सात वर्षे झाल्यानंतर, आता दोन चिल्लीपिल्ली सांभाळत तिने एका मैत्रिणीच्या सोबत नवा व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. ती असे अनेक व्यवसाय सुरू करो व तिची अशीच भरभराट होवो या दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अश्विनीला सदिच्छा!




मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.