मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश सज्ज; पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यासाठी साकारले वाळू शिल्प

    09-Jun-2024
Total Views |
 swearing-in ceremony
 
भुवनेश्वर : आज दि. ९ जून २०२४ नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याच्याआधी प्रख्यात वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी, ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी वाळूचे शिल्प तयार केले. पुरी समुद्रकिनाऱ्यावर तयार करण्यात आलेल्या वाळूच्या कलाकृतीमध्ये नरेंद्र मोदींची प्रतिमा आणि 'अभिनंदन मोदी जी ३.०' संदेशही लिहिला आहे.
 
या अभिनंदन संदेशासोबत पटनायक यांनी कलाकृतीच्या खाली 'विकसित भारत' असेही लिहिले आहे. पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोस्टर लावण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान म्हणून मोदींच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होईल.
  
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा एकदा केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही शपथ घेणार आहेत. भारताच्या शेजारील देश आणि हिंदी महासागर क्षेत्रातील अनेक नेते आणि राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
 
श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहलयांच्यासह इतर देशांचे पाहूणे शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.