उत्तरे हरवलेले प्रश्न...

    08-Jun-2024
Total Views |
suicide mental health


नुकतीच मुंबईतील प्रशासकीय अधिकारी असणार्‍या दाम्पत्याच्या मुलीने, इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा उच्चपदस्थ पालकांच्या पाल्यांनी केलेला आत्महत्येचा प्रश्न चर्चेत आला. त्यानिमित्ताने आत्महत्येचा मानशास्त्रीय अंगाने आढावा घेणारा हा लेख...

मागच्या आठवड्यात माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेला एक आठ वर्षांचा मुलगा, मला उत्साहाने एका सिनेमाची कथा सांगत होता. बोलता बोलता तो म्हणाला, ’... और पता है क्या हुआ मॅम? फिर उस लडकेने ना, बिल्डिंग से कूद कर सुसाईड कर ली...’. बोलण्याच्या ओघात तो गोष्ट पुढे सांगत राहिला. मी मात्र त्याच्या या वाक्यापाशी थबकले. आठ वर्षाच्या मुलाने इतक्या कॅजुअली वापरलेल्या ‘सुसाईड’ या शब्दाने, माझ्या हृदयात क्षणभर एक कळ येऊन गेली. अर्थात, त्या मुलाला या वयात या शब्दाची भावनिक तीव्रता समजावी, अशी अपेक्षाच नाही. तरीही इतक्या सहजपणे उच्चार होण्याइतकी ही घटना कॉमन झाली आहे का? हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.

गेल्या वीस वर्षांपासून वेगवेगळ्या देशातल्या, संस्कृतीमधल्या, वयोगटातल्या, आर्थिक-सामाजिक स्तरातल्या, लोकांना काउन्सिलिंग करताना आत्महत्या, सुसाईड, सुसाइडल थॉट्स, हे शब्द अनेकवेळा समोर येतात. त्या शब्दांमधली वेदना, हतबलता, नैराश्य प्रत्येकवेळी मनाला भिडते. मानसशास्त्राच्या क्षेत्रात काम करताना, सुरुवातीच्या काळात या शब्दांनी मन दडपून जायचे. कालांतराने पेशंट्सकडून सांगितल्या जाणार्‍या आत्महत्येविषयीच्या विचारांकडे, जास्त आस्थेने पाहता यायला लागले. इतक्या लोकांची त्याबाबतची वेदना समजून घेतल्यानंतर, कुणी आत्महत्येचा कॅज्युअली उल्लेख केला तर मन अस्वस्थ होतं हे खरं!

आपल्या देशात आत्महत्या करणार्‍या व्यक्तींची संख्या, गेल्या काही वर्षात खूप वेगाने वाढत आहे. भारतात २०२२ मध्ये १ लाख ७० हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याची नोंद झाली. हा आकडा काळजीत टाकणारा आहे. आज प्रत्येक ३ सेकंदांमध्ये किमान एक व्यक्ती आत्महत्येचा विचार करते, आणि प्रत्येक ४० सेकंदांमध्ये एक व्यक्ती आत्महत्या करण्यात यशस्वी होते. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातले आणि आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक स्तरातले लोक आहेत. अगदी अलीकडे आलेली दुर्दैवी बातमी म्हणजे, मुंबईतील प्रशासकीय अधिकारी असणार्‍या दाम्पत्याच्या मुलीने, बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. उच्चपदस्थ आई-वडील, आर्थिक सुस्थिती आणि चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी असूनही ,या मुलीने असे टोकाचे पाऊल का उचलले असेल? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. अशी, आर्थिक-शैक्षणिक-सामाजिक परिस्थिती चांगली असणार्‍या कुटुंबांत आत्महत्येच्या घटना पूर्वीही घडलेल्या आहेत. वरकरणी सुस्थितीत दिसत असणार्‍या अशा कुटुंबातील किशोरवयीन मुले ते मध्यमवयीन व्यक्ती, यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण ऐकत, वाचत असतो. रोजच्या वर्तमानपत्रात एकतरी सुसाईडची बातमी वाचायला मिळते. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य कमी झाले आहे का? हा अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा मुद्दा आहे. खरंतर, इतक्या मोठ्या प्रमाणात या घटना आपल्या आजूबाजूला घडत असताना, याबाबत जास्त गांभीर्याने विचार व्हायला हवा, नाही का?

कुठलीही व्यक्ती जेव्हा आत्महत्येसारखा अंतिम निर्णय घेते, तेव्हा तिच्या पश्चात मागे राहणार्‍या व्यक्तींसाठी अनेक प्रश्नांचे मोहोळ उठवून जाते. हे प्रश्न बहुतेकवेळा कुटुंबीयांना आयुष्यभर डसत राहतात. पश्चात्ताप, अपराधीपण, राग, अतीव दुःख, हतबलता अशा भावनांचे हे डंख, अत्यंत वेदनादायक असतात. स्वतःचे आयुष्य संपवण्यासारखा इतका गंभीर निर्णय घेण्यापाठीमागे काय प्रेरणा असेल? आत्मघात करण्याच्या काही क्षण आधी, व्यक्तीची मानसिकता काय असेल? यावर अनेक अभ्यास होत राहतात. काही अभ्यासांतून असे लक्षात येते आहे की, १५ ते २९ या खरेतर शारीरिक व मानसिकदृष्ट्या अत्यंत उत्साही, सकारात्मक असणार्‍या वयोगटातल्या तरुण मुला-मुलींमध्ये, आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. कुठल्याच व्यक्तीच्या या अशा निर्णयापाठीमागची कारणमीमांसा समजणे कठीण आहे. तशात आर्थिक-शैक्षणिक-सामाजिक स्थिरता असणार्‍या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा सुसाईडचा पर्याय निवडतात, तेव्हा तर ते अजूनच कोड्यात टाकणारे ठरते. अशा वेळी लक्षात येते की, पैसा, प्रतिष्ठा, शिक्षण, सामाजिक स्थान या गोष्टी जगण्यासाठी उपयोगी असल्या, तरी पुरेशा नाहीत. प्रत्येक व्यक्ती त्यापलीकडेही काहीतरी शोधत असते. आनंद, समाधान, मानसिक स्थैर्य या गोष्टी जिवंत राहण्यासाठी जास्त आवश्यक आहेत.

आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असताना आणि आपल्या आजूबाजूला, काही वेळा आपल्या घरातही अशा दुर्दैवी घटना घडत असताना, आपण सगळ्यांनी समाजाचे घटक म्हणून हा विषय समजून घेणे खूप गरजेचे आहे. या विषयाकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे. आत्महत्येचे, सुसाइडल थॉट्सचे एकमेव असे कारण कधीच नसते. अनेक लोकांच्या आयुष्यात खूप तणावपूर्ण प्रसंग येत राहतात. जवळच्या व्यक्तीचा मृत्यूमुळे तीव्र दुःखाच्या, चिंतेच्या, संतापाच्या, एकटेपणाच्या भावना मनात घर करून राहतात. यातून कधी कधी ’माझाच मृत्यू झाला असता तर बरे झाले असते.’ असे विचारही मनात येऊन जातात. पण बहुतांश लोक लगेच आत्महत्येच्या पर्यायाकडे वळत नाहीत.

एखादी व्यक्ती मुळातच डिप्रेशन, अँगझायटी यासारख्या मानसिक अस्वास्थ्यातून जात असेल, तर तिच्या बाबतीत आयुष्यातल्या तणावपूर्ण घटना दीर्घकालीन स्ट्रेस निर्माण करतात, त्यातून तीव्र निराशावादी विचारसरणी तयार होते. आणि याकारणांनी अशी व्यक्ती आत्महत्येचा मार्ग पत्करण्याचा धोका वाढू शकतो. अभ्यासांतून लक्षात आले आहे की, आत्महत्या करणार्‍या प्रत्येकी ३ पैकी २ व्यक्ती घटनेच्या वेळी ’डिप्रेशन’ या मानसिक आजाराची शिकार झालेल्या असतात. काही मानसिक आजारांचे लक्षण असणारा आततायीपणा (इम्पल्सिव्हिटी), त्याचबरोबर व्यसने, अंमली पदार्थांचे (ड्रग्स) सेवन, या बाबीही तरुणांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या, मित्रमंडळींमधल्या एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल, तरीदेखील आत्महत्येविषयीचे विचार मागे राहिलेल्या व्यक्तीच्या मनात येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीने लहानपणी काही शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार सहन केले असतील; पालकांचे व जवळच्या मोठ्या व्यक्तींचे दुर्लक्ष त्याच्या वाट्याला आले असेल, किंवा त्याच्या बाबतीत काही क्लेशदायक (ट्रॉमॅटिक) घटना घडल्या असतील, तर व्यक्ती आत्महत्येचे विचार आणि कृती याकडे वळू शकते. सध्याच्या जगात, अकॅडमिक परफॉर्मन्सचे प्रेशर, इतरांकडून नाकारले जाणे (रिजेक्शन), एकटेपणाची भावना, रिलेशनशिपमधले ब्रेक-अप्स, बुलिंग, सोशल मीडिया ट्रोलिंग, मानसिक आजाराचे एक लक्षण म्हणून, स्वतःला शारीरिक इजा करणे, सेक्शुअल ओरिएंटेशन व त्याबद्दलचा संभ्रम, घटस्फोट, नात्यांमधल्या तडजोडी, बॉडी इमेज, बॉडी शेमिंग, अशा अनेक कारणांनी तरुण व्यक्ती आत्महत्येच्या पर्यायाकडे वळतात.

या सगळ्यावर, ’ही पिढीच कमकुवत आहे. आयुष्यात स्ट्रगल करायला नको यांना.’ अशा कमेंट्स करणे सोपे आहे. ‘हे रोजचंच झालंय’ म्हणून दुर्लक्ष करणेही अवघड नाही. पण इतक्या वेगाने वाढणारी ही समस्या, आपलंही दार ठोठावणार नाही ना? याचा विचार समाजातल्या प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने करायला हवा. आपल्या देशाला भेडसावणार्‍या या गंभीर समस्येविषयी पालक म्हणून, शिक्षक म्हणून, आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो हे लक्षात घेऊया.

आपल्या परिवारातल्या व्यक्तींच्या, विद्यार्थ्यांच्या, आसपासच्या तरुणांच्या वर्तनाकडे, लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात खालीलपैकी काही बाबी जाणवल्या तर त्याकडे दुर्लक्ष करणे, लाईटली घेणे घातक ठरू शकते.

एखादी व्यक्ती आत्महत्येविषयी बोलत असेल. ’आय एम गोइंग टू किल मायसेल्फ’; ’मीच मेले असते तर बरं झालं असतं’ किंवा ’मी जन्मालाच आलो नसतो तर, सगळ्यांना त्रासच झाला नसता.’ अशी वाक्ये कुणाच्या बोलण्यात येत असतील, तर त्यांना मदतीची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ‘आत्महत्या करणार्‍या व्यक्ती, त्याविषयी काही बोलत नाहीत’ हा गैरसमज आहे. आपण लक्ष देऊन ऐकायला हवे.

एखादा मित्र अचानकपणे इतरांमध्ये न मिसळता एकटा राहायला लागला असेल, मित्रांच्या गेट-टूगेदरला येणे त्याने बंद केले असेल, तर त्याविषयी त्याच्या घरच्यांशी बोलले पाहिजे. त्याला मदत घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.

एखाद्या व्यक्तीचे वारंवार मूड-स्विंग्स होत असतील. ती कधी अतिउत्साही असते, तर दुसर्‍या दिवशी तिचा मूड खूप डाऊन होतो. शिवाय तिच्या वागण्यात अचानक चिंता, अनाठायी चिडचिड वाढली आहे. कुणी कौतुक केले तरी ती इरिटेट होते. असे लक्षात आले तर तिच्याशी शांतपणे आणि आश्वासकपणे बोलले पाहिजे.

कुणी सतत मृत्यू, हिंसाचार याविषयीचेच विचार मांडत असेल, त्याच प्रकारचे व्हिडिओज बघत असेल, तर हेही सिरियसली घेणे गरजेचे आहे.

आपल्या सद्यःपरिस्थितीत आपण अडकून पडलो आहोत, हतबल आहोत अशी भावना वारंवार जाणवत असेल, तर त्यावर एखाद्या जवळच्या विश्वासू व्यक्तींशी बोलले पाहिजे.

काही लोकांचे अल्कोहोल ड्रिंकिंगचे प्रमाण वाढते. ते वारंवार ड्रग्ज घेऊ लागतात. अशा वेळी त्यांनी लवकरात लवकर प्रोफेशनल मदत घेतली पाहिजे. त्यासाठी कुटुंबियांनी, मित्रपरिवाराने त्यांना प्रवृत्त केले पाहिजे.

नेहमीचे रुटीन, खाण्याच्या सवयी, झोपण्याच्या वेळा अचानक बदलून जाणे हेही नैराश्यग्रस्त असण्याचे एक महत्वाचे लक्षण आहे. त्याचे व्यवस्थित निदान व्हायला हवे.

बेपर्वाईने गाडी चालवणे, स्वतःला शारीरिक इजा करणे, अशा रिस्की आणि आत्मघातकी गोष्टी करायला सुरुवात करणे किंवा त्या वारंवार करणे अशा वागण्याकडेही गांभीर्याने पाहायला हवे.

एखाद्याने काहीही कारण नसताना आपल्या चीजवस्तू इतरांना वाटून टाकायला सुरुवात केली असेल, तर या वागण्याचीही मस्करी न करता त्याच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे.

लोकांचा खूप गांभीयाने, भावनिकतेने निरोप घेणे. हा देखिल आत्महत्येच्या विचारांचा परिणाम असू शकतो. अशा वेळी या व्यक्तीला शक्यतो एकटे सोडणे योग्य नाही.

आत्महत्येच्या विचारांची लक्षणे किंवा धोक्याच्या पूर्वसूचना, प्रत्येकवेळी खूप स्पष्टपणे दिसतीलच असे नाही. काही लोक त्यांची लक्षणे स्पष्टपणे दाखवतात, तर काही लोक ’ऑल इज वेल’ चे मुखवटे घालून वावरत राहतात. आत्महत्या आणि आत्महत्येचे विचार मानसिक आजारांशी जोडलेले आहेत. मानसिक आरोग्याच्या समस्या, योग्य उपाययोजना आणि उपचारांनी सोडवता येतात. त्यातून आत्महत्येच्या पर्यायाकडे जाणे टाळता येऊ शकते. याउलट आत्महत्येद्वारे मृत्यूला कवटाळणार्‍या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या, बिघडलेल्या मनःस्वास्थ्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या अजून गंभीर होत जातात. आणि हे दुष्टचक्र असेच चालू राहते. अशा वेळी समाजघटक म्हणून आपण जागरूक आणि सेन्सिटिव्ह राहिलो, तर स्पष्टपणे दिसणार्‍या लक्षणांना आपण योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळवून देऊ शकतो. शिवाय मुखवट्यांमागची वेदनाही आपल्याला जाणवू शकते!!


गुंजन कुलकर्णी
चाईल्ड आणि फॅमिली सायकॉलॉजिस्ट
७७७५०९२२७७
gunjan.mhcgmail.com