शिवराज्यभिषेक दिन

    08-Jun-2024
Total Views |
shivrajyabhishek dinनुकताच ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजारा झाला. महराजांना सिंहासनावर बसवणे एवढेच याचे महत्व नाही, तर परकीय जोखडांना झुगारत, गुलामीच्या विरोधात स्वकीयांच्या कल्याणासाठी एक त्यांचे हक्काचे राज्य उभे राहिले आहे, याचा ढळढळीत पुरावा होता हा शिवराज्याभिषेक. या राज्याभिषेकाच्या अधिक कांगोर्‍यांचा आढावा या लेखातून घेऊया....

नास्रोदमासच्या भविष्यवाणीलाही लाजवेल अशी भविष्यवाणी, ४ जूनच्या सकाळपर्यंत एक्झिट पोलच्या माध्यमातून विविध प्रसारमाध्यमातून सांगितली जात होती. ’विकसित भारत’ या स्वप्नाची धुरा खांद्यावर वाहणारा धुरंधर नेता कोण असेल? या सगळ्यांची उत्तरं लवकरच सत्यात उतरतीलही, कदाचित त्यासाठी सर्वांना ६ जून २०२४ पर्यंत वाट पाहावी लागेल.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ३ जूनपासून सुरू झालेले हे चित्र, ६ जूनला कदाचित अधिक उठावदार असेल. पण ही तारीख फार भाग्याची आहे. याच दिवशी ३५० वर्षांपूर्वी शिवछत्रपती राजे झाले. आजच्या राजकारण्यांपेक्षा जनतेला याच दिवसाचे जास्त अप्रूप आहे. कारण ’सुराज्य’ आणि ’अच्छे दिन’ येण्याची भविष्यवाणी, हाच नवआशावाद घेऊन राजांनी राज्याभिषेक केला तो जनतेसाठी म्हणून. या सर्व निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व. तो का साजरा व्हावा, याची कारणे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावी या दृष्टीने एक शिक्षक म्हणून हा लेखप्रपंच.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. ही घटना आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, भारतासाठीच नव्हे तर, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी झालेली ही ऐतिहासिक घटना आहे. महाराजांच्या राजमुद्रेत ’मुद्रा भद्राय राजते’ चा उल्लेख केला आहे. म्हणजे हे रयतेच्या कल्याणासाठी स्थापलेलं जगातील पहिले राज्य आहे. छत्रपतींचा इतिहास हा तुम्हा आम्हां सर्वांसाठी नुसताच प्रेरणादायक नाही, तर वर्तमानकाळात आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शकही आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी इसवी सन १६७४ किल्ले रायगडावर अत्यंत दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा काशीच्या वेदविद्यासंपन्न गागाभट्टांनी, देशातील सात नद्यांच्या जलाने शिवरायांना अभिषेक करून संपन्न केला. अनेक शतकानंतर रयतेला स्वतःचा सार्वभौम राजा मिळाला.

 
शिवराज्याभिषेकाची आवश्यकता का होती?

राक्षसी वृत्ती असणार्‍या मुघलांच्या व सुलतानांच्या टाचेखाली अवघा देश भरडून निघत होता. अशावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती होणे, म्हणजेच सार्वभौम राजा होणे ही भारताच्या इतिहासातील विलक्षण घटना होती. महाराजांचे राज्य लोककल्याणकारी होते.

निजामशाहीच्या अखेरच्या काळात गादीला वारस नसताना, शहाजीराजांनी निजामाचा दूरवरचा वंशज मोर्तजा याला गादीवर बसवले व त्याच्या नावाने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. पण ते स्वतः गादीवर बसू शकले नाहीत. या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी राज्याभिषेकाची आवश्यकता होती.

सुलतान, मुघल, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, सिद्धी महाराजांना राजा मानत नव्हते. फार तर ते एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा किंवा नेता यापेक्षा वेगळे स्थान स्थानिक व इतर सत्ताधीश देत नव्हते. रयतेत महाराजांबद्दल प्रचंड आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी होती. पण प्रशासकीय कामे करताना मुघल किंवा सुलतान यांचे शिक्के लागत. त्यामुळे रयतेची द्विधा मनस्थिती होई. महाराज परंपरागत राजे नव्हते. त्यांनी छत्रपती होण्यासाठी कोणताही विधी केलेला नव्हता. राज्य असूनही राजे पण नाही, त्यामुळे राजकीय स्थैर्य येत नव्हते. लोकांचा विश्वास निर्माण होण्यात प्रशासकीय अडचणी येत होत्या. स्वतः महाराजांना कोणा सुलतानाच्या किंवा बादशहाच्या कृपेने राजा हा किताब नको होता. शिवरायांनी ज्या अठरापगड जातीजमातीच्या समाजबांधवांना स्वराज्याची हाक दिली होती, स्वाभिमानाची हाक दिली होती, परकीयांच्या जोखडातून मुक्ततेचे आव्हान केले होते, ते स्वराज्य निर्माण झाले होते. आता त्यांना प्रस्थापित राज्यव्यवस्थेची गरज होती. सर्वमान्य राजा हवा होता. राज्य व्यवस्थेसाठी एका अधिष्ठानाची आवश्यकता होती. त्यातून सर्वमान्य असे रयतेचे राज्य निर्माण होणार होते. राजे रयतेच्या हृदयसिंहासनावर आधीच विराजमान होते. आता ते लौकिक अर्थाने सिंहासनावर विराजमान होणार होते. त्यांचे अभिषिक्तसम्राट होणे, त्यावेळच्या परिस्थितीसाठी आवश्यक होते. जे परंपरेने राजे आहेत मग सुलतान किंवा मोगल हेच राजे होऊ शकतात. हा एक गैरसमज सामान्यांमध्ये होता तो घालवणे आवश्यक होते.

अशा काळात शिवरायांनी धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेक करून, शक्तिशाली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणूनच हा दिवस येथील स्थानिक जनतेसाठी एक गौरवाचा क्षण होता. हिंदवी स्वराज्याची नवी राजधानी म्हणून, शिवरायांनी रायगड किल्ल्याची निवड केली. राजधानीच्या सुरक्षेेच्या दृष्टीने त्याची भक्कम बांधणी करण्याची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवण्यात आली होती.


शिवराज्याभिषेकाने काय साध्य झाले?

राज्याभिषेकाचे महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे, महाराजांनी स्वतःच्या मस्तकावर छत्र धारण करून, स्वतःस छत्रपती म्हणवले. स्वतःच्या नावाने सोन्याची नाणी पाडली. राज्याभिषेकाच्या दिवसापासून राज्याभिषेक शक, अशी कालगणना सुरू केली. महाराज शककर्ते झाले. राज्य व्यवहारकोश निर्माण करून, महाराजांनी राज्यकारभारात पारसी शब्दांऐवजी मातृभाषेतील शब्दांचा वापर सुरू केला. राज्याभिषेकामुळे कैद्यांना शिक्षा देणे शक्य झाले. शेजारच्या राज्यांशी करार करणे सोयीचे झाले.


शिवराज्याभिषेक दिन का साजरा करायचा?

१) महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले होते. आपले सहकारी रावजी सोमनाथ यास हिंदवी स्वराज्याच्या सीमांचे वर्णन करताना ते म्हणतात, ’सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत, हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा’ दुर्दैवाने ते अल्पायुषी ठरल्याने, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आजही ते स्वप्न अपूर्णच आहे. महाराजांचे ते स्वप्न फलद्रूप होण्यासाठी आपण शिवराज्याभिषेक दिन साजरा करत राहू. कारण, हा दिवस आपल्याला नियमितपणे महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देत राहतो.

२) राज्यकर्त्यांनी जनतेच्या भावनांची कदर करावी, यासाठी उदाहरणार्थ १७५७ ला प्लासीच्या विजयानंतर ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह हा प्लासी गावात आपल्या ब्रिटिश तालवाद्यांच्या साथीने सैन्याचे मार्चिंग करत राजवाड्यावर गेला. रस्त्याच्या दुतर्फा हजारो स्थानिक नागरिक होते. रॉबर्ट क्लाइव्हच्या मते, जर त्या प्रत्येक नागरिकाने आमच्यावर एकेक दगड उचलून फेकला असता, तरी आम्ही जिवंत राहिलो नसतो. पण एकाही नागरिकाने असे केले नाही. त्याने याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला असे लक्षात आले की, येथील जनता नवाबाच्या म्हणजे सिराज उदौलच्या राज्यकारभाराला प्रचंड विटलेली होती. तेव्हा हा परकीय कोणी का असेना, तो चालेल पण सिराज उदौला नको. ही भावना स्थानिक जनतेची झालेली होती. या उलट महाराजांच्या स्वराज्यात सैनिक व जनता दोन्हीही एकमेकांच्या साथीने शत्रूचा प्रतिकार करताना दिसून येतात. १६८० ला महाराजांच्या निधनानंतर आपली प्रचंड फौज व अब्जावधी संपत्ती घेऊन स्वराज्याचा घास घेण्यासाठी आलेल्या आलमगिराला, १७०७ पर्यंत मराठ्यांनी अनेक वेळेला नेता नसतानाही नामोहरण केलं. ज्या लोककल्याणाच्या भूमिकेने स्वराज्य स्थापन झाले, त्या भावनेचा आज विचार होण्याची आवश्यकता आहे.

३) प्रेरणा देणार्‍या यंत्रणा - हिंदवी स्वराज्य माझे आहे, मला ते टिकवले पाहिजे, वाढविले पाहिजे, जपले पाहिजे, ही भावना रयतेत निर्माण करण्यात महाराज यशस्वी झाले होते. महाराजांकडून मिळालेली प्रेरणा ही मावळ्यांसाठी व रयतेसाठी किती महत्त्वाची होती, याचे उत्तर शोधताना एखादी व्यक्ती आपल्या राज्यासाठी जास्तीतजास्त काय करू शकते? तर तो आपल्या जीवाची बाजी लावू शकतो. आपल्या प्राणांचे मोल देऊ शकतो. आपले प्राण देऊ शकतो. हे एकदा नेतृत्वाला जमलं की, असाध्य ते साध्य होण्यास सुरुवात होते. स्वराज्यासाठी किती लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, यांची यादी आपल्याला निश्चित माहीत नाही, पण या यादीतील अनेक नावे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघराला माहिती आहेत. इतिहासाचा अभ्यास करता फार कमी सत्ताधीशांना हे साध्य झालेले दिसते. आजही स्वराज्याविषयीची ती भावना लोकांमध्ये त्या प्रमाणात दिसत नाही. तेव्हा निश्चितच वाटून जाते की, कदाचित आज प्रेरणा देणार्‍या यंत्रणांमध्ये दोष आहे. आज आम्ही आमची प्रेरणास्थाने ही भगवा, हिरवा, निळा, लाल रंगांमध्ये विभागून टाकली आहेत.

४) परकीय आक्रमकाचे योग्य आकलन - महाराजांना परकीय आक्रमकाचे आकलन झाले होते. परकीय आक्रमकांचा उद्देश हा केवळ संपत्ती मिळवणे, किंवा सत्ताविस्तार हा नसून सोबत धर्मप्रचार व प्रसार करणे हा सुद्धा आहे. दुर्दैवाने आजही याचे आपल्याला म्हणावे तसे आकलन झाले आहे, असे दिसत नाही. किमान पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून शिवराज्याभिषेक दिन साजरा करणे काळाची गरज आहे.

५) आपल्या पूर्वजांनी अखंड भारत निर्माण केला होता. नवीन संसदेतही आपण अखंड भारताचे चित्र लावलेले आहेच. पण आज तो अखंड राहिला नाही. महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला सतत त्याची आठवण करून देतो. अखंड भारत पुन्हा होण्यासाठी आपण काय केले पाहिजे याचे मार्गदर्शनही करतो.

६) राज्याभिषेकाचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे, कितीही कठीण परिस्थिती असू द्या मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती प्रत्यक्षात उतरवता येतात. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवराज्याभिषेक होय. शिवराज्याभिषेकाचा नियमितपणे अभ्यास करणे आज काळाची गरज आहे.


प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे
के.रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली
९९६७८१७८७६
prashantshirude१६७४@gmail.com