धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले

    08-Jun-2024
Total Views |
raje laxmanrao maharaj bhosale


संघस्थापनेपासून ज्या मित्राने अहोरात्र सहकार्य केले, राजेपणाची कोणतीही आडकाठी मित्रत्त्वाच्या नात्यात येऊ दिली नाही, त्या श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांच्या आकस्मिक मृत्यूवार्तेने पूजनीय डॉक्टरसाहेब अत्यंत व्यथित झाले आणि संघ शिक्षा वर्गाचा नियोजित समारोप श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांच्या श्रद्धांजली सभेत परिवर्तित झाला. श्रीमंत लक्ष्मणराव महाराज भोसले हे जरी नागपूरकर भोसल्यांच्या धाकट्या पातीचे अध्वर्यू असले, तरी वैदर्भीय सावरकरनिष्ठांच्या मांदियाळीतली त्यांची थोरवी अनन्यसाधारण होती. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा विशेष लेख...
 
देदीप्यमान पराक्रमाने आणि लढवय्या बाण्याने ज्यांनी ‘अटक ते कटक’ असा नावलौकिक मिळविला, ते नागपूरकर भोसले नृपती हे मूळचे छत्रपतींच्या सातारा गादीशी नाते असलेले मराठा संस्थानिक आहेत. नागपूरकर भोसले संस्थानचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) हे हिंदुभाग्यभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे होत. पुढे छत्रपती संभाजी महाराजांंच्या मृत्यूनंतर रघुजी महाराज मध्य प्रांत आणि वर्‍हाडात दाखल झाले. त्यानंतर देवगड येथे बस्तान बसवून गोंड राणीच्या पत्रामुळे रघुजी भोसले नागपुरात आले. गोंड संस्थानचा आपसांतील सत्तासंघर्ष मिटवल्याने गोंड राणीने, रघुजी राजेंना भाऊ मानले आणि आपले अर्धे राज्य देऊन नागपुरातच राहण्याची विनंती केली. ‘एक म्यान में दो तलवार नही रह सकती...’ हे वचन खोटे ठरवत एकाच नगरात दोन राजे (गोंड आणि भोसले) गुण्यागोविंदाने राहू शकतात, हे नागपूरने दाखवून दिले. नागपूरकर भोसल्यांची थोरली आणि धाकटी पाती (‘सिनियर भोसला’ आणि ‘ज्युनियर भोसला’) असे दोन राजवाडे नागपुरातील जुन्या महाल भागात आहेत. यातील धाकट्या पातीचे श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदुभाग्यभूषण’ या वचनाला आपल्या नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्वाने सार्थ ठरविणारे ‘धर्मभूषण’च म्हटले पाहिजेत.

श्रीमंत राजेबहादूर जानोजी महाराज (द्वितीय) भोसले आणि श्रीमंत महाराणी काशीबाईसाहेब (द्वितीय) या धर्मशील दाम्पत्याच्या पोटी दि. २१ ऑगस्ट १८७७ रोजी श्रीमंत लक्ष्मणराव महाराज यांचा जन्म झाला. बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असलेल्या लक्ष्मणराव यांचे पितृछत्र वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हरपले. याही परिस्थितीत खचून न जाता, राजमाता काशीबाईसाहेब बाळ लक्ष्मणास रामायण, महाभारतातील कथा सांगत. आईचे संस्कार आणि राजपरिवाराची शिस्त या तालमीत बाळ लक्ष्मण तयार होत होता. लक्ष्मणरावांच्या संस्कृत अध्ययनासाठी वैदिक विद्वान राजवाड्यात येत असत. घोडेस्वारी, पोहणे, कुस्ती यात लक्ष्मणराव तरबेज झाले होते.

मलबार प्रकरणामुळे आणि ठिकठिकाणी घडणार्‍या जातीय दंग्यांमुळे हिंदू संघटनेला चालना मिळाली आणि हिंदू समाजाच्या विराट स्वरूपाचे दर्शन इसवी सन १९२३च्या भाद्रपदात घडले. निमित्त ठरले ते गणेशपेठेतील दिंडी प्रकरण! गणेशपेठेत जन्माष्टमी, काकडआरती, नामसप्ताह हे उत्सव वर्षभर अव्याहत चालत असत. गणेशपेठेतील एका मारवाडी गृहस्थाचे मैदान होते. आजूबाजूला संपूर्ण हिंदू वस्ती, काही तुरळक मुसलमान होते. मुसलमानांनी मैदानावर नमाज पढण्याची परवानगी मागितली आणि त्याने ती दिली. एका वर्षात मैदानावर झोपडीवजा मशीद उभी राहिली. सहिष्णू हिंदू समाजाने कोणतीही आडकाठी न घेता हे चालू दिले. एक वर्षाने या मशिदीचे पक्के बांधकाम झाले आणि हळूहळू कटकटी, तंटे यांना सुरुवात झाली. सुरुवातीला हिंदूंच्या वाद्यासहित मिरवणुका यांना कोणताही त्रास होणार नाही, असे म्हणणार्‍या मूठभर मुस्लिमांची आता घरातील वीणा, मृदंग, टाळ यांनादेखील विरोध करण्यापर्यंत मजल गेली. तहसीलदार, सिटी मॅजिस्ट्रेट यांनी मुस्लिमांना सामोपचाराच्या गोष्टी सांगून पाहिल्या, पण शेवटी प्रकरण चिघळलेच. ऑक्टोबर १९२३ मध्ये काकडआरतीची दिंडी होती, तिलाही अटकाव होईल, असे गृहीत धरून राजे लक्ष्मणराव महाराजांनी मुसलमान पुढार्‍यांना बोलावून त्याबद्दल त्यांना खडसावून विचारले असता, त्यांनी ती दिंडी नेण्यास मान्यता दिली. वास्तविक पाहता सर्वपंथ समाधार अशी वैचारिक रीती-नीती असलेल्या नागपूरकर भोसल्यांच्या सहिष्णू वृत्तीमुळेच नागपूर संस्थानात दर्गे, मशिदी उभारले जाऊ शकले होते. तरीही मुस्लिमांच्या खोड्या काही केल्या कमी होत नव्हत्या. पहिल्या दिवशी दिंडी सुखरूप गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी मात्र पोलिसांच्या उपस्थितीत दिंडीवरच खटला भरला गेला. आपल्याच देशात आपल्याच राज्यात कुळकुळाचारी दिंडी उत्सवांना विरोध आणि सरकारचा बंदी आदेश, हे धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराजांना सहन झाले नाही. या प्रकाराला तोंड देण्यासाठी राजेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. डॉ. हेडगेवार, डॉ. चोळकर, डॉ. ल. वा. परांजपे ही मंडळी या समितीत होती. राजकीय मतभेद बाजूला सारून नागपुरातील समस्त हिंदू समाज भोसल्यांच्या हाकेवर एकत्र येणे, ही अभूतपूर्व घटना होती. दि. ३१ ऑक्टोबर १९२३ पासून मोठ्या प्रमाणात दिंडीसत्र सुरू झाले. ‘विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल...’ या नामाचा जयजयकार आसमंतात निनादत होता. गुरुवार, ८ नोव्हेंबरच्या दिंडीत डॉ. हेडगेवार अग्रभागी अशी ४१ जणांची दिंडी निघाली व ती बघायला हजारो लोक जमले होते. दिंडी पाहायला खुद्द श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले आल्याने दबा धरून बसलेल्या ४००-५०० मुसलमानांची बोबडी वळली होती.

आ सिन्धु-सिन्धु पर्यन्ता,
यस्य भारत भूमिका:
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यापक हिंदुत्वाला श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी पूर्णतः अंगीकारले होते. त्यामुळेच आता स्वतः राजेसाहेबांनी दिंडी प्रकरणात प्रत्यक्ष सामील होण्याचा निर्णय घेतला. दि. ११ नोव्हेंबर १९२३ भाऊबीजेचा दिवस! हा दिंडी सत्याग्रहाचा कळसाध्याय ठरला. कारण, या दिवशी दिंडीचे नेतृत्व स्वतः नागपूरकर भोसले श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज करीत होते. दिंडी बघायला संपूर्ण नागपूर लोटले होते. सुमारे २५ हजार नागरिक असावेत. पोलिसांचा ताफादेखील रोजच्यापेक्षा जास्त होता. हिंदू समाजाचे उत्स्फूर्त आणि विराटरूप पाहून मुसलमानांनी स्वतःहून दिंडीला पुढे जाऊ दिले. संघटित हिंदू समाजाचे नरशार्दूल रूपात झालेले प्रकटीकरण हे नागपूरच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला कलाटणी देणारे ठरले, यात संशय नाही. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याच दिवशी म्हणजे दि. ११ नोव्हेंबर १९२३च्या रात्री महालातील नगर भवन (टाऊन हॉल) मैदानावर विजयसभा घेण्यात आली आणि त्यात श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी नागपूरनगर हिंदू महासभा स्थापन झाल्याचे घोषित केले. सरदार गुजर, श्रीमंत राजे लक्ष्मणराव भोसले, काळीकर, डॉ. परांजपे, विश्वनाथ केळकर आदी नागपूर शाखेत कार्यरत होते. टाऊन हॉल येथे झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी होते. नागपूर नगरातील हिंदूंचे धार्मिक आणि सामाजिक संरक्षण करण्याची व्यवस्था करणे, हिंदूधर्मांतर्गत जातीजातीत ऐक्य व प्रेम वृद्धिंगत करणे, वहिवाटीप्रमाणे प्रत्येक मोहल्ल्यातील सर्व जातीजमातीच्या लोकांनी त्या त्या मोहल्ल्यातील नियत केलेल्या देवळात देवदर्शनास येण्याचा प्रघात ठेवणे आणि प्रत्येक मोहल्ल्यातील बारा ते अठरा वर्षांच्या मुलांच्या शारीरिक शिक्षणाची सोय करणे, हे ठराव संमत करण्यात आले. या सभेत एका कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले, सहअध्यक्ष गंगाधरराव चिटणीस आणि उपाध्यक्ष व्यंकटराव गुर्जर होते.

तत्कालीन विदर्भ-वर्‍हाडात ब्राह्मण-ब्राह्मणेतर स्पृश्यास्पृश्य वाद ऐरणीवर आला होता. श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज हे स्वा. सावरकरांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा प्रश्नच नव्हता, पण या वादाला दस्तुरखुद्द राजेसाहेबांनीच कृतीतून उत्तर द्यावे, अशी योजना धर्मवीर डॉ. मुंजे यांनी मांडली आणि श्रीमंत राजसाहेबांच्या वाड्यात त्यांच्या मुलांच्या म्हणजे राजकुमारांच्या मुंजी वैदिक पद्धतीने लावण्यात आल्या. यासाठी पुणे येथून चित्रशाळेचे वैदिक विद्वान वासुदेवराव जोशी यांचे सहकार्य लाभले होते. श्रीमंत राजेसाहेबांच्या मुलाची मुंज वेदोक्त पद्धतीने लागल्याने ‘यथा राजा तथा प्रजा’ या न्यायाने नागपूर प्रांतातील इतर क्षत्रियांच्या घरचे धर्मसंस्कार वैदिक पद्धतीने सुरू झाले.

तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु!
तो महादेवजी पिता आपुला,
चला तयाला वंदू!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या या समरसता गीताला कृतीत आणून श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी केलेली ही अभिनव समरसता क्रांतीच होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्म सोडलेल्या लोकांची शुद्धी (शुद्धीकरण किंवा घरवापसी) करण्यासाठी अनेकांना प्रवृत्त केले. त्यात नागपूर आणि विदर्भ मागे कसा राहील? धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या पुढाकाराने नागपुरातील भिडे कन्या शाळेच्या प्रांगणात मोठा शुद्धीकरणाचा समारंभ पार पडला. श्रीसंत पाचलेगावकर महाराजांच्या पावन उपस्थितीत संपन्न झालेल्या या समारंभाचे प्रमुख यजमानपद श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी स्वीकारले होते. नागपुरातील या सोहळ्यानंतर धाकदपटशा, प्रलोभन अथवा चुकीने धर्मांतरित झालेले अनेक बंधू, भगिनी हिंदू धर्मात परत यायला सुरुवात झाली.

१९३८ मध्ये नागपुरात हिंदू महासभेचे अधिवेशन झाले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती मिरवणूक काढण्यात आली. सावरकरांच्या नेतृत्वाखाली निजामाविरुद्ध सत्याग्रह करण्यात आला, त्याचे मुख्य केंद्र नागपूर होते. आचार्य नरेंद्र देव, भैयाजी दाणी, तात्या पहेलवान, हरिकिशन वर्मा आदींनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यावेळी हिंदू महासभा ‘सावधान’ नावाच्या वृत्तपत्राद्वारे लोकांना जागृती करत होती. नंतर या वृत्तपत्रावर बंदी घालण्यात आली. १९४७ पर्यंत नागपूर हे हिंदू राष्ट्रवादी प्रचाराचे केंद्र होत. नागपूरचे श्रीमंत राजेबहादूर रघुजीराव महाराज भोसले (चतुर्थ -१८७२-१९५८) आणि श्रीमंत राजेबहादूर राजे लक्ष्मणराव महाराज भोसले (१८७७-१९३२) हे दोन बंधू संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे समकालीन असून त्यांचा डॉक्टरांवर व संघावर विशेष लोभ होता. श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज साहेबांनीच खटपट करून संघास साळूबाई मोहित्यांचा वाडा दिला. राजेसाहेबांच्याच कृपाछत्राखाली संघ वाढीस लागला. समाजातील काही उपटसुंभांना संघाचे वर्धिष्णू होत चाललेले कार्य डोळ्यांत खुपत होते, अशा काही लोकांनी साळूबाई मोहिते वाड्यावर संघाची शाखा भरविण्यास आडकाठी केली असता, राजे लक्ष्मणराव महाराजांनी हत्तीखाना, बेलबाग किंवा तुळशीबाग ही स्थाने पूजनीय डॉक्टर साहेबांना सुचविली. त्यानुसार काही काळ भोसले संस्थानच्या तुळशीबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केंद्रशाखा चालत होती.

मूळचे मुंबईचे असलेले गोविंद गणेश तथा काकासाहेब चोळकर स्वातंत्र्यसंग्रामातील जनसंपर्कामुळे समाजातील अनाथ, निराधार मुलांची दयनीय अवस्था पाहून गहिवरले. डॉ. भवानी शंकर नियोगी, डॉ. ना. भा. खरे, डॉ. बा. शि. मुंजे, डॉ. केशवराव हेडगेवार, डॉ. मो. रा. चोळकर, डॉ. ल. रा. परांजपे, दाजीसाहेब बुटी अशा समविचारी सहकार्‍यांच्या सहकार्याने काकासाहेबांनी दि. २६ ऑगस्ट १९२२ रोजी श्रीमंत राजे लक्ष्मणराव भोसले ह्यांच्या नागपूरमधील महाल येथील राजवाड्यात ‘अनाथ विद्यार्थी गृहा’ची स्थापना केली. पहिल्या दिवशी पाच मुले होती. पुढील काळात मुलांची संख्या व संस्थेचा व्याप वाढू लागला. जागेची अडचण भासू लागली. तेव्हा नागपूर म्युनिसिपल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. भवानीशंकर नियोगी व उपाध्यक्ष डॉ. मो. रा. चोळकर यांनी १९२६ मध्ये पूर्व नागपूरमधील लकडगंज विभागातील पाच एकर जागा संस्थेला उपलब्ध करून दिली.

नागपूरच्या सकल सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यात नागपूरकर भोसले अग्रेसर राहत असत. शुक्रवार तळाच्या बेटावर नागपूरकर भोसले स्थापित मारुती आणि महादेव होता, त्याची नासधूस मुस्लिमांनी केल्यानंतर राजे लक्ष्मणराव महाराजांनी बेटावर जाण्यासाठी हिंदू नावाडी आणि पुजार्‍यांची व्यवस्था करून दिली. हिंदू तरुणांना शस्त्रपारंगत करण्यासाठी ‘रायफल मंडळ’ स्थापन केले. भारत व्यायामशाळा, नागपूर व्यायामशाळा अशा आखाड्यांना श्रीमंत भोसल्यांचा नेहमीच आशीर्वाद असे. अंजनगावसुर्जीच्या देवनाथ महाराजांचे सद्गुरू असलेले गोविंदनाथ यांच्या बर्‍हाणपूर येथील तापीतीरावरील गोविंदनाथ स्वामी मठाचे बांधकाम जगद्गुरू देवनाथांचे काळातच झाले होते. पुढे गोविंदनाथ महाराजांचे निर्वाण झाल्यावर त्यास्थानी समाधीस्थळ निर्माण व श्रीराम पंचायतन स्थापना करण्यात आली होती. काळाच्या ओघात आणि महापुरादी नैसर्गिक आपत्तीमुळे या स्थानाने दोन-तीनदा आघात सहन केले आहे. श्रीनाथ पीठाचे १६वे पीठाधीश समर्थ सद्गुरूआचार्य श्रीमारोतीनाथ महाराज यांच्या कार्यकाळात इसवी सन १९१८ यावर्षी नागपूरकर भोसले संस्थानचे श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले व पुढे संघ संस्थापक झालेले क्रांतिकारक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी बर्‍हाणपूर मठाचा जीर्णोद्धार केला होता. अशारितीने तत्कालीन नागपूर प्रांतात जिथे जिथे आवश्यकता पडली, तिथे तिथे हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुधर्माभिमानाच्या रक्षणासाठी श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले स्वतःहून पुढाकार घेत, त्यामुळेच त्यांना ‘धर्मभूषण’ म्हटले जाऊ लागले.

महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरच्या लोकांनी ठराव केला. परंतु, विदर्भ आणि मध्य प्रांतात मिठागरे नसल्याने जंगल सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले. लोकनायक माधवराव अणे यांनी जंगल सत्याग्रहाची रूपरेषा ठरवली. डॉ हेडगेवार यांनी जंगल सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी सरसंघचालकपदाचा त्याग करून डॉ. लक्ष्मणराव वासुदेवराव परांजपे यांची सरसंघचालकपदी नियुक्ती केली. डॉ. हेडगेवार आणि श्रीमंत राजे लक्ष्मणराव हे जीवश्च कंठश्च मित्र होत. त्यामुळे डॉ. हेडगेवारांच्या अनुपस्थितीत डॉ ल. वा. परांजपे यांच्या नेतृत्वात चालणार्‍या रा. स्व. संघाच्या सर्व कार्यक्रमांना श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज जातीने हजर राहत. १९३०च्या विजयादशमी उत्सवाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांनी हिंदू समाजाकरिता संघकार्याची आवश्यकता आणि ते कार्य नेटाने पुढे चालविण्यासाठी देवदुर्लभ कार्यकर्त्यांचा संच याची गरज प्रतिपादित केली. श्रीमंत महाराजांच्या मुखातून जणू काही पूजनीय डॉ. हेडगेवार बोलत आहेत, असाच काहीसा भास स्वयंसेवक आणि नागरिकांना होत होता. इतके या दोन विभूतींचे तादात्म्य होते.

एकीकडे स्वतःस्वातंत्र्यवीर सावरकरनिष्ठ आणि दुसर्‍या बाजूला पूजनीय डॉ. हेडगेवारांसारखे मित्र असल्याने, श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज सर्वच जनमानसात लोकप्रिय होते. ‘लोकराजा’ म्हणून त्यांनी नागपूरकरांच्या हृदयात स्थान प्राप्त केले होते. ९ जून १९३२ नाशिक मुक्कामी श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांचे देहावसान झाले. ही वार्ता नागपुरात येऊन धडकली, तेव्हा संघाचा ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प (तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग) सुरू होता आणि त्याचदिवशी त्याचा सायंकाळी प्रकट समारोप निश्चित होता. मात्र, संघस्थापनेपासून ज्या मित्राने अहोरात्र सहकार्य केले, राजेपणाची कोणतीही आडकाठी मित्रत्त्वाच्या नात्यात येऊ दिली नाही, त्या श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांच्या आकस्मिक मृत्यूवार्तेने पूजनीय डॉक्टरसाहेब अत्यंत व्यथित झाले आणि संघ शिक्षा वर्गाचा नियोजित समारोप श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज यांच्या श्रद्धांजली सभेत परिवर्तित झाला. श्रीमंत लक्ष्मणराव महाराज भोसले हे जरी नागपूरकर भोसल्यांच्या धाकट्या पातीचे अध्वर्यू असले, तरी वैदर्भीय सावरकरनिष्ठांच्या मांदियाळीतली त्यांची थोरवी अनन्यसाधारण होती. श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन!

डॉ. भालचंद्र हरदास
(लेखक नागपूरच्या रामदेवबाबा विद्यापीठात प्राध्यापक असून भारतीय शिक्षण मंडळाचे नागपूर महानगर संयोजक आहेत.)
९६५७७२०२४२