'घर उद्ध्वस्त, कुटुंब धोक्यात': निवडणूकीनंतर भाजप कार्यकर्त्यांना टीएमसीच्या गुंडांकडून धमक्या!

    08-Jun-2024
Total Views |
post-poll violence in West Bengal

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांची गावे आणि घरे सोडून पळून जावे लागले. २०२१ च्या विधानसभा आणि २०२३ च्या पंचायत निवडणुकीनंतरही भाजप कार्यकर्त्यांना बेघर व्हावे लागले होते. आजही पश्चिम बंगालमधील जनता त्याच परिस्थितीचा सामना करत आहे.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ जून २०२४ रोजी एक अहवाल प्रकाशित झाला. ज्यात या संपुर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आलेली आहे. याबद्दल भाजप कार्यकर्ते प्रशांत हलदर म्हणाले की, "निवडणुकीचा हंगाम म्हणजे आमच्यासाठी घर सोडण्याच हंगाम आहे.

हलदर हे बरुईपूरच्या विद्याधर पल्ली भागातील रहिवासी आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान केल्यानंतर ते स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय घरातून पळून गेले होते. त्यांनी पत्नी आणि मुलांना एका नातेवाईकाच्या घरी पाठवले.घरातून पळून गेल्यानंतर प्रशांत हलदरने इतर ५० जणांसह बरुईपूर येथील भाजप कार्यालयात आश्रय घेतला आहे. “२०२१मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आणि गेल्या वर्षी पंचायत निवडणुकीनंतर मला घर सोडण्यास भाग पाडले गेले,” असे ही हलदर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

दु:ख व्यक्त करताना भाजपचा कार्यकर्ता म्हणाला, “मी या वर्षी एप्रिलमध्ये घरी परतलो. दुःखाची गोष्ट म्हणजे आता मी पुन्हा एकदा बेघर झालो आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मला आणि माझ्या गावातील इतर कार्यकर्त्यांना धमक्या आल्या होत्या, तरीही मी पक्षासाठी काम केले. मात्र, २ जून रोजी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर मला घरातून पळून जावे लागले. “नंतर माझ्या घराची तोडफोड झाल्याची माहिती मला मिळालेली आहे."

मामोनी दास नावाच्या आणखी एका पक्षाच्या कार्यकर्त्यानेही जवळपास अशीच एक भयानक घटना सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, टीएमसीच्या गुंडांनी त्यांना दक्षिण २४ परगणामधील माथेरदिघी गावात असलेल्या त्यांच्या घरातून जबरदस्तीने हाकलून दिले होते. ती म्हणाली, "यानंतर मी सहपारा आणि नंतर काठपोल येथे भाड्याच्या घरात राहिले,तरीही आम्हाला धमक्या येत आहेत."