अनधिकृत बांधकामांना आश्रय; दुय्यम अभियंत्याचे थेट निलंबन

वेसावेतील सागरी किनारा क्षेत्रात अनधिकृत बांधकाम

    08-Jun-2024
Total Views |

bmc
मुंबई, दि.८: मुंबईतील वेसावे (वर्सोवा) येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणे, वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही त्यांचे निष्कासन न करणे, कामकाजातील इतर नियमित बाबींमध्ये देखील निष्काळजीपणा केल्याप्रकरणी के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांची देखील बदली करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या समक्ष बैठकीस उपस्थित राहण्याची सूचना दिल्यानंतरही गैरहजर राहून निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल सोमेश शिंदे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, के पश्चिम विभागात सोमेश शिंदे २०२२ पासून दुय्यम अभियंता पदावर कार्यरत आहेत. यांच्याकडे प्रभाग क्रमांक ५९,६० आणि ६३ यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. प्रभाग क्रमांक ५९ आणि ६३ यामध्ये अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरफार, मुक्या जमिनीवरील बांधकामे, विशेषतः वेसावे येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरात व दलदलीच्या जमिनीवर अनाधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. या सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी सोमेश शिंदे यांना वारंवार सूचना केल्या होत्या. तसेच, वेसावे भागातील अधिकृत बांधकामांविषयी महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना सविस्तर माहिती देऊन निष्कासनाची कारवाई दिनांक ३ जून रोजी नियोजित होती.
त्याबाबत निर्देश मिळाल्यानंतर देखील सोमेश शिंदे यांनी निष्कासनासाठी कोणतीही तयारी केली नाही. एवढेच नव्हे तर दिनांक ३ जून आणि ४ जून रोजी प्रत्यक्ष निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली. गंभीर बाब म्हणजे, दिनांक ५ जून रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी सोमेश शिंदे आणि स्वप्निल कोळेकर यांना के पूर्व विभाग कार्यालयात बैठकीसाठी बोलावले होते. तथापि सोमेश शिंदे या बैठकीस गैरहजर राहिले आणि महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांचे त्यांनी उल्लंघन केले. या सर्व प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन सोमेश शिंदे यांना प्रशासकीय कामकाजातील बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि त्यातून महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणे या कारणांसाठी खाते अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत दि. ७ जूनपासून निलंबित करण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी विशेष पथक
दरम्यान, वेसावे परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त गगराणी यांची लेखी मंजुरी प्राप्त करण्यात आली आहे. वेसावे येथे विशेषतः सागरी किनारा नियमन क्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची नगररचना भूमापन क्रमांकानुसार, अक्षांश व रेखांशासह बांधकामांचे आडवे उभे तपशिलासह यादी तयार करणे, वेसावेच्या बाहेरील बाजूस नव्याने होत असलेल्या अथवा सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर प्राधान्याने प्रथम तोडक कारवाई करण्याची व्यवस्था करणे, निष्कासन कारवाईसाठी स्थानिक पोलिसांशी योग्य समन्वय राखून पोलीस संरक्षण प्राप्त करणे, निष्कासन कारवाई साठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ आणि इतर साहित्य आदी योग्य तयारी करणे, निष्कासन कारवाईदरम्यान काही अडचणी येऊ नये यासाठी परिमंडळाचे सह आयुक्त आणि के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेणे आणि झालेल्या कारवाईचा अहवाल सादर करणे या सर्व जबाबदाऱ्या सदर पथकाकडे सोपवण्यात आल्या आहेत.