भारताच्या आत्म्याचे प्रतीक म्हणजे ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’!

भाजप, रालोआ संसदीय नेता आणि लोकसभा नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड

    08-Jun-2024
Total Views |
narendra moi  
 
 नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) संसदीय नेता आणि लोकसभेचे नेते म्हणून शुक्रवार, दि. 7 जून रोजी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी भारताच्या आत्म्याचे प्रतीकत म्हणजे रालोआ, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.जुन्या संसद भवनाच्या केंद्रीय सभागृहामध्ये भाजप-रालोआच्या नवनिर्वाचित खासदार आणि नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय नेता, रालोआ संसदीय नेते आणि लोकसभेच्या नेतेपदी एकमताने निवड केली. यावेळी रालोआ घटकपक्षांचे नेते, भाजप-रालोआशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रालोआ घटकपक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले.
 
पंतप्रधान म्हणाले की, ”देशातील जनतेने तब्बल सहा दशकांनी इतिहास घडवून सलग तिसर्‍यांदा रालोआस सत्ता बहाल केली आहे. याद्वारे रालोआच्या विकासाभिमुख कारभारावर भारतीय जनतेचा विश्वास असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतीय राजकारणातील आघाडीचे राजकारण अभ्यासल्यास सर्वाधिक यश रालोआस मिळाले असल्याचे दिसून येते. एकेकाळी भाजपमध्ये पक्षसंघटनेचे काम करताना आपण रालोआचे घटक होते, तर आता गेल्या 10 वर्षांपासून रालोआच्या नेतेपदी काम करत असल्याचा अनुभव अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.” भारताच्या स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांमध्ये रालोआस 30 वर्षे झाली आहेत. या प्रवासात तीनवेळी पाच वर्षे सरकार चालविण्याची संधी मिळाली यंदा चौथी संधीही प्राप्त झाली आहे. त्यामुळे आगामी 10 वर्षे रालोआ देशास नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले.
 
सुशासन हे रालोआ नेत्यांचे वैशिष्ट्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, गरिब कल्याणास केंद्रस्थानी ठेवून दहा वर्षे कारभार केला आहे. भारतीय नागरिकांच्या आकांक्षा तसेच प्रादेशिक व राष्ट्रीय आकांक्षांना समान बघण्याचे रालोआचे धोरण आहे. संपूर्ण जगात आता भारताकडे विश्वबंधू म्हणून बघितले जात आहे. त्याचप्रमाणे यंदा शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष असून शिवछत्रपतींच्या राष्ट्रप्रथम भावनेस पुढे ठेवूनच वाटचाल करणार असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
 
यंदाही शंभर आकडा गाठणे अशक्य काँग्रेस पक्षाला दहा वर्षांनंतरही 100 जागांचा आकडा गाठण्यास अपयश आले आहे. 2014 ते 2024 मिळून काँग्रेसच्या जेवढ्या जागा आहेत, तेवढ्या तर भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे 4 जूनपासूनचे विरोधकांचे वर्तन पाहता त्यांच्यामध्ये लोकशाही संस्कार रुजण्यास आणखी वेळ लागेल, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. रालोआचा वटवृक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही नैसर्गिक आघाडी आहे. अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, प्रकाशसिंग बादल, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव आदी नेत्यांनी या आघाडीचे बीज रोवले होते. आता मात्र या आघाडीचा वटवृक्ष झाला आहे, अशी भावनिक टिप्पणीदेखील पंतप्रधानांनी यावेळी केली.
 
व्यासपीठावर नेत्यांची मांदियाळी व्यासपीठावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जदयुचे नितीश कुमार, तेलुगू देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, लोजपाचे (रामविलास) चिराग पासवान, जनसेनेचे पवन कल्याण, जनता दल सेक्युलरचे एच. डी. कुमारस्वामी, हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जितनराम मांझी आणि अपना दलाच्या अनुप्रिया पटेल उपस्थित होत्या.