बीएमसीच्या सखोल स्वच्छता मोहिमेला वेग

२९ आठवड्यात ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते केले स्वच्छ

    08-Jun-2024
Total Views |

B.M.C
 
मुंबई: महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी शनिवार, दि. ८ जून रोजी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात ८५ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कच-याचे संकलन करण्यात आले. तर, ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. मुंबई महानगरात गत २९ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.
 
संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवार, दि.८ जून रोजी सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ८५ मेट्रिक टन राडारोडा, २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कच-याचे संकलन करण्यात आले. सुमारे ३१६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली. १ हजार २२० कामगार – कर्मचा-यांनी १७१ संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणाही दिमतीला होती.
 
ए विभागात संग्रहालय विभाग , गणेश नगर, कुपरेज मार्ग, नाथालाल पारेख मार्ग, डी विभागात पट्ठे बापूराव मार्ग, एफ उत्तर विभागात एडनवाला मार्ग, माहेश्वरी उद्यान ते पाच उद्यान मार्ग, जी दक्षिण विभागात मुरारी घाग मार्ग, एच पूर्व विभागात माहिम कॅाज वे पूल ते मिलन सब वे, वाकोला पोलीस स्थानक परिसर, के पूर्व विभागात प्रभाग ८६ मधील झोपडपट्टी व तत्सम परिसर, के पश्चिम विभागात वेसावे येथील मत्स्य पालन विद्यापीठ मार्ग, सुंदरवाडी, बद्रीनाथ टॉवर, एल विभागात कुर्ला पूर्व येथील स. गो. बर्वे मार्ग, मदर डेअरी मार्ग, एम पूर्व विभागात शरदवाडी चेंबुर, एन विभागात घाटकोपर पश्चिम येथील वर्षा नगर मार्ग, पी दक्षिण विभागात आरे मार्ग, पी उत्तर विभागात मालाड पश्चिम येथील जोड रस्ता , स्वामी विवेकानंद मार्ग, आर दक्षिण विभागात कांदिवली पश्चिम येथे नवा जोड मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पश्चिम, आर मध्य विभागात गणेश मंदिर मार्ग, सोनी केबल मार्ग, संस्कृती मार्ग,सिद्धार्थ नगर, टी विभागात मुलुंड आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.