पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग प्रगतीपथावर

गेमचेंजर प्रकल्पामुळे कायापालट होणार

    08-Jun-2024
Total Views |

karjat panvel


मुंबई, दि.८ :
पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गातील सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. सध्या ठाणे-दिवा दरम्यानचा पारसिक बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा आहे. मुंबईतील सीएसएमटी कर्जत मार्गावर धावणाऱ्या लोकलवर ताण येत असल्याने प्रवाशांना प्रवास गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुंबईवरून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरून पनवेल येथून थेट लोकलने कर्जत गाठणे शक्य होणार आहे.

कर्जत हे मुंबई-पुण्याला जोडणारे एक महत्वाचे जंक्शन आहे. त्यामुळे कर्जतमध्ये लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कर्जतवरून जलद गतीने लोकलने जाता यावे, यासाठी पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. येत्या दोन वर्षात हार्बर मार्गावरील सीएसएमटी स्थानकावरून पनवेलमार्गे थेट कर्जत गाठणे शक्य होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेचे काम वेगात सुरू आहे. या रेल्वे मार्गात ३,१६४ मीटर लांबीचे नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे आहेत. यापैकी नढाल येथील बोगद्याची लांबी २१९ मीटर आणि किरवली येथील बोगद्याची लांबी ३०० मीटर आहे.

५० टक्के काम पूर्ण

पनवेल-कर्जतदरम्यान सुमारे २९.६ किमी लांबीचा दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. या मार्गात दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल उभारण्यात येणार आहेत. या मार्गिकेसाठी २,७८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सध्या एकूण ५० टक्के कामे पूर्ण झाली असून डिसेंबर २०२५ पर्यंत दुहेरी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमआरव्हीसीने ठेवले आहे.

मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा

वावर्ले बोगदा खणायला न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. सध्या ठाणे-दिवा मार्गावर पारसिक बोगदा हा मुंबई महानगर परिसरातील सर्वाधिक लांबाची बोगदा आहे. मात्र, आता वावर्ले बोगदा हा सर्वाधिक लांबीचा ठरणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाचे काम सध्या वेगात सुरु आहे. या मार्गावर नढाल, किरवली, आणि वावर्ले असे तीन बोगदे असणार आहेत. यापैकी नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर, किरवली बोगद्याची लांबी ३०० मीटर इतकी आहे.