राणाभीमदेवी थाटात वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांचा भ्रमनिरास!

भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचा सणसणीत टोला

    08-Jun-2024
Total Views |
sanjay Rayut  
मुंबई- संजय राऊत वैफल्यग्रस्त झालेत. त्यांना वाटले होते केंद्रात सरकार येईल. सत्तेत आल्यावर आम्ही हे करू, ते करू अशा प्रकारच्या राणाभीमदेवी थाटात त्यांची वक्तव्य आणि घोषणा होत्या. आता त्यांचा सगळा भ्रमनिरास झाला. असा सणसणीत टोला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच पुन्हा मोदी सरकार आले, पुन्हा राज्यातले वातावरण चांगले होऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे भविष्यात आपल्या पुढे काय वाडलेय या चिंतेत राऊत आहेत. त्या चिंतेतून संजय राऊत अशाप्रकारची वक्तव्य करत असल्याचेही दरेकर म्हणाले. देशात असलेल्या प्राप्त परिस्थितीनुसार निकाल आलेत. महाराष्ट्रातील राजकारण एकतर्फी, जातीय व्यवस्थेमध्ये विभागले गेले त्यामुळे असा निकाल लागला आहे.
 
तसे पाहीले तर उद्धव ठाकरे यांनी काय मिळवले ? एवढ्या जागा लढवूनही त्यांना केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी १५ जागा लढवून त्यांना ७ जागा मिळाल्यात. कोकण हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जायचा तिथे भाजपा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने घवघवीत यश मिळवले .उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली असेल परंतु त्याचे मतात परिवर्तन झालेले नाही त्याचा फायदा काँग्रेसला झाला. परंतु भाजपा आणि शिवसेना यावर उद्धव ठाकरेंचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. दरेकर पुढे म्हणाले की, भाजपा सगळ्या आव्हानांना सामोरे जात आज इथपर्यंत पोचली आहे. दोन खासदारांपासूनचा प्रवास देशाने पाहिलेला आहे. महायुतीत असणारे पक्षही संघर्ष करणाऱ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आहेत.
 
महायुती म्हणून एकत्रितपणे या सगळ्या आव्हानांचा नीट विचार करून सामोरे जाऊ आणि विधानसभेला निर्विवाद अशा प्रकारचे बहुमत मिळवू, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूका लढविण्याचा अधिकार आहे. आंदोलन करण्याचा देखील अधिकार आहे. याबाबत सरकार योग्य ती दखल घेऊन हस्तक्षेप करेल आणि यातून सुवर्णमध्य साधण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल .माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, राजकारणात उद्धव ठाकरे हे ज्या क्षणी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले त्या दिवशी राजकारणात कुणीही कुठेही जाऊ शकतो. रोहित पवार भाजपात येऊ शकतात .
 
संजय राऊत यांच्यावर टीका करताना दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी मोदी सरकार येणार नाही अशा प्रकारे भविष्य सांगितले होते. परंतु सरकार आलेही आणि उद्या ते देशाचे पंतप्रधान होताहेता. सकाळी उठून केवळ डरकळ्या फोडायच्या या पलीकडे संजय राऊत यांना काम नाही. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांनी ५ वर्ष आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली देशहितासाठी एकत्र असू हे ठणकावून सांगितले आहे. हे संजय राऊत यांना ऐकायला आले नाही का? असा सवालही दरेकरांनी केला.
 
जयंत पाटील यांची घुसमट ते वेगळा निर्णय घेऊ शकतात
दरेकर म्हणाले की, शरद पवार यांचा पक्ष त्यांचा घरचा पक्ष झाला आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार आता युगेंद्र पवार त्यामुळे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांची घुसमट होतेय. रोहित पवार नेतृत्व करायला पुढे येताहेत. त्यांना प्रदेशाध्यक्ष करा अशा प्रकारची मागणी होतं आहे. आपल्याला चांगले वातावरण आहे तर जयंत पाटील यांना बाजूला करा अशा प्रकारचे एक कटकारस्थान त्यांच्यात सुरू आहे. हे कारस्थान यशस्वी होण्याआधीच जयंत पाटील वेगळा निर्णय घेऊ शकतात.