‘म्हाडा’च्या १७३ दुकानांसाठी ५७० अर्ज

बोली निश्चित करून ११ किंवा १२ जून २०२४ रोजी १७३ दुकानांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.

    08-Jun-2024
Total Views |

mhada


मुंबई, दि.८: 
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील १७३ दुकानांच्या ई- लिलावासाठी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली असून या दुकानांसाठी ५७० अर्ज सादर झाले आहेत. आता बोली निश्चित करून ११ किंवा १२ जून २०२४ रोजी १७३ दुकानांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. म्हाडाच्या गृहप्रकल्पात काही दुकानांसाठीच्या गाळ्यांची बांधणी करणे बंधनकारक असते. या दुकानांची विक्री संबंधित विभागीय मंडळामार्फत ई-लिलाव पद्धतीने केली जाते. यासाठी अर्ज मागविण्यात येतात आणि म्हाडाच्या मुंबईमंडळाकडून एक बोली निश्चित केली जाते, या बोलीपेक्षा अधिक बोली लावणाऱ्या अर्जदाराला दुकान वितरित केले जाते. त्यानुसार मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई-लिलावासाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध केली होती. १ मार्चपासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीला सुरुवात करण्यात आली होती. आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीनुसार ५ जून रोजी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीची मुदत अखेर संपुष्टात आली.