पवई दगडफेक प्रकरणी ५७ अटकेत

अतिक्रमण हटविताना पालिका अधिकारी आणि पोलिसांवर दगडफेक

    08-Jun-2024
Total Views |

pavai


मुंबई, दि. ८ :
पवई परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पोलीस आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवर स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ५७ जणांना अटक त्यात सहा महिलांचा समावेश आहे. याशिवाय १५ महिलांना नोटीस देण्यात आली आहे.
या जमावाने तेथील महिलेच्या घरावरही हल्ला केल्याचा आरोप असून त्यात एक तीन वर्षांची मुलगी जखमी झाली. त्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पवईच्या जय भीम नगर भागात पालिकेच्या एस विभाग कार्यालयामार्फत अतिक्रमण हटवण्याबाबत ३ जून रोजी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार पालिका अधिकारी, कर्मचारी ६ जून रोजी कारवाई केली. यासाठी पवई पोलिसांकडून पालिकेने मागितलेला बंदोबस्तही पुरविण्यात आला होता. मात्र या वेळी पोलिसांवरच स्थानिकांनी दगडफेक करायला सुरुवात केली. दगडफेकीच्या वेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी दगडफेक सुरूच ठेवल्याने पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

पवईगाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० इतक्या झोपड्या असलेली ‘लेबर हटमेंट’ तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आली होती. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास दिले होते. महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार या झोपडपट्टीधारकांना यापूर्वी देखील नोटिस देण्यात आल्या होत्या. तसेच, मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ४८८ तरतुदीनुसार, या झोपड्यांच्या कब्जेदारांना शनिवार, दि. १ जून २०२४रोजी कायदेशीर नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. ४८ तासांच्या आत स्वत:हून ही अतिक्रमणे निष्कासित न केल्यास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले होते. याचाच अर्थ, महानगरपालिका प्रशासनाने विहित प्रक्रिया पूर्ण केली तसेच आगाऊ सूचना देवून पुरेसा वेळ देखील दिला होता.
त्यानुसार, गुरूवार, दिनांक ०६ जून रोजी महानगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरू केली. या कारवाईप्रसंगी स्थाानिक रहिवाशांनी विरोध करत दगडफेक केली. या घटनेत महानगरपालिकेचे ५ अभियंते, ५ मजूर व त्यासोबत १५ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, कायद्याचे पालन करुन ही निष्कासन मोहीम यापुढे देखील सुरू राहणार असल्याची भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.