विनातिकीट दंड वसुलीपोटी पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत ३८ कोटी

तिकीट तपासणी मोहिमेची चोख अंमलबाजवणी

    08-Jun-2024
Total Views |

western railway


मुंबई, दि.८ :
 पश्चिम रेल्वेवरील सर्व सेवा वैध प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी चालवली जात आहे. अशावेळी मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन्स, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समध्ये तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र आणि कठोर करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाद्वारे एप्रिल ते मे, २०२४ या कालावधीत तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. परिणामी, मुंबई उपनगरीय विभागातून वसूल करण्यात आलेल्या १०.२८ कोटी रुपयांसह ३८.०३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मे २०२४ मध्ये बुक न केलेल्या सामानासह २.८० लाख तिकीटविहीन/अनियमित प्रवाशांचा शोध घेऊन १७.१९ कोटी रुपये वसूल करण्यात आले. याव्यतिरिक्त, मे महिन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात १ लाखांहून अधिक प्रकरणे शोधून काढली आणि ४.७१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एसी लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी नियमित सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमांचा परिणाम म्हणून एप्रिल आणि मे २०२४ मध्ये सुमारे ८५०० अनधिकृत प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला असून सुमारे २९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने नेहमी योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.