दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; युएपीए कलमांतर्गत आरोपींवर कारवाई!
07 Jun 2024 19:02:11
नवी दिल्ली : संसदेत घुसखोरी करणाऱ्या सर्व आरोपींवर दिल्ली पोलिसांकडून युएपीए कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. युएपीए कलमांतर्गत कारवाई करण्याची परवानगी दिल्लीचे नायब राज्यपाल यांनी पोलिसांना दिली आहे. यानंतर आता दिल्ली पोलीस संसदेवरील हल्ल्यातील सर्व आरोपींवर युएपीए कलम लावणार आहेत.
दरम्यान, १३ डिसेंबर २०२३ रोजी दोन लोकांनी सभागृहाच्या कामकाजादरम्यान संसदेवर हल्ला करण्याकरिता धुरजन्य वस्तू लपवून संसदेत प्रवेश केला होता. यामध्ये मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम रानोलिया, ललित झा आणि महेश कुमावत नावाच्या सहा जणांवर लोकसभेच्या थेट अधिवेशनादरम्यान बेकायदेशीरपणे संसदेत प्रवेश केल्याचा आणि कलर स्प्रेचे डबे फेकल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी युएपीए कलम १६ व १८ अंतर्गत आरोपींवर खटला चालवण्याची विनंती केली होती. त्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपालांनी पोलीस तपासादरम्यान पुरेसे पुरावे सापडल्यानंतर मंजूर केली आहे. दिल्ली पोलिसांनी दि. ३० मे रोजी तपास यंत्रणेने गोळा केलेले संपूर्ण पुरावे तपासले आणि संसद हल्ल्यातील आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.