येत्या ०९ जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार!

    07-Jun-2024
Total Views |
narendra modi take oath pm


नवी दिल्ली :     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी राष्ट्रपतींनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले असून उद्या, ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक सलग तिसरा शपथविधी होईल. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात 'रालोआ'स स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.

त्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'रालोआ'कडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत असल्याचे राष्ट्रपतींना सांगितले. त्यासाठी सहकारी पक्षांच्या पाठिंब्याची पत्रेही त्यांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्द केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले असून ९ जून रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'रालोआ' घटकपक्षांनी आपली पंतप्रधानपदी निवड केल्याची माहिती राष्ट्रपतींना दिली. त्यानंतर राष्ट्रपतींनी आपल्याला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले असून ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाची यादी सादर करण्यात येणार आहे.

आगामी पाच वर्षेही वेगवान विकासाची असतील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली. ते पुढे म्हणाले, २०१४ साली आपण नवखे होतो, आता मात्र आपल्याला आणि सहकाऱ्यांना पुरेसा अनुभव प्राप्त झाला आहे. त्यामुळे लगेचच कामास सुरूवात केली जाईल. गेल्या दहा वर्षात सुशासन आणि विकास अतिशय गतीने साधला आहे, त्याच गतीने पुढील ५ वर्षेही त्याचं गतीने व समर्पण भावनेने काम होईल. सध्याच्या जागतिक अस्वस्थतेच्या वातावरणात भारताकडे जग आशेने बघत असून भारताच्या 'विश्वबंधू' प्रतिमेचा लाभ आता मिळेल, असाही विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.मंत्रिमंडळाची खलबते सुरू

एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली, त्याचवेळी दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी 'रालोआ' घटकपक्षांनी बैठक सुरू होती. यावेळी नड्डा यांनी सहकारी पक्षांच्या मागण्या आणि मते जाणून घेतली. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत सहभागी झाले होते.