मुंबई-गोवा महामार्गावर बिबट्याच्या नखांचे तस्कर गजाआड

    07-Jun-2024
Total Views |


leopard nails poaching

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील खेड गावातील जाधववाडी परिसरात बिबट्याच्या नखांची तस्करी आणि अवैध विक्री करणाऱ्या ३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. झडतीमध्ये आरोपींकडे ४ नखे सापडली असून विक्रीसाठी आणलेली रिक्षा ही हस्तगत करण्यात आली आहे.


खेड तालुक्यातील भरणे गावामध्ये बिबट्याच्या नखांची विक्री करण्यासाठी जाधववाडी येथे रिक्षामधून एक व्यक्ती येईल अशी माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे बुधवार दि. ५ जून रोजी मुंबई-गोवा महामार्गावरच्या जाधववाडी येथे सापळा रचण्यात आला असून यामध्ये दिलीप कडलग, अतुल दांडेकर आणि विनोद कदम या तिघांना अटक करण्यात आली. त्यांची झडती घेतल्यानंतर दिलीप यांच्याकडे ४ नखे सापडली असून या चार नखांबरोबरच संबंधित रिक्षाही हस्तगत करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर ही चार बिबट्याची नखे रत्नागिरीतील लांजा येथून सचिन गुरव यांच्याकडून आणली असं त्यांनी कबूल केले तसेच त्यांच्याकडे आणखी चार नखे असल्याचं सांगितलं. लांज्यामध्ये ही सापळा रचून या आरोपीला वनविभागाने अटक करण्यात आली आहे.


या कारवाईमध्ये रत्नागिरीच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, प्रकाश पाटील, वनपाल सुरेश उपरे, साताप्पा सावंत, रामदास खोत यांच्यासह इतर वनकर्मचारी उपस्थीत होते.