हँगिंग गार्डनमधील झाडांची कत्तल न करता होणार जलाशयांची पुनर्बांधणी!

मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

    07-Jun-2024
Total Views |
hanging garden mp lodha
 


मुंबई :    हँगिंग गार्डनमधील झाडांची कत्तल न करता जलाशयांची पुनर्बांधणी करण्याचे निर्देश राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा मलबारहिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवार, दि. ७ जून रोजी दिले.  मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री लोढा यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, मुंबई शहरातील मोकळ्या जागांपैकी हँगिंग गार्डन ही एक महत्त्वाची जागा आहे.
 

या जागेचा वापर करणाऱ्या नागरिकांचा आणि त्या ठिकाणी असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आपण आदर करायला हवा. येथील झाडांची कत्तल न करता जलाशयाची दुरुस्ती होऊ शकते. त्यासाठीच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी निवडलेले टेंडर रद्द करण्यास पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांचा पुनर्बांधणीसाठी असलेला विरोध, निर्णय प्रक्रियेमध्ये गेलेला वेळ आणि तज्ज्ञांचे मत या सर्वांचाच विचार करता, मलबार हिल येथील जलाशयाची पुनर्बांधणी न करता आतमधल्या बाजूने दुरुस्ती करावी. तसेच या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे झाडांची कत्तल अथवा निसर्ग सौंदर्याचा विध्वंस होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे महापालिकेला दिले आहेत.