महान सायरस आणि त्याचा सिलेंडर

    07-Jun-2024
Total Views |
Cyrus Cylinder


जागतिक घडामोडी या अतिशय गुंतागुंतीच्या असतात. इतिहासात घडलेल्या घटनांची सावली, वर्तमानातल्या घटनांवर पडलेली असते. अनेक देशांच्या उदाहरणातून हेच गृहितक सत्य असल्याचे प्रतीत होते. त्यातूनच निर्माण झालेल्या गुंतागुंतीतूनच संघर्षाची ठिणगी पडते. अशीच गुंतागुंत असलेल्या सायरसच्या सिलेंडरची माहिती या लेखातून घेऊया.

दिनांक १३ एप्रिल २०२४ च्या मध्यरात्री इराणने काही ड्रोन्स, काही क्रूझ क्षेपणास्त्रे आणि काही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे इस्रायलच्या, ’गोलन हाईट्स’ या परिसरावर डागली. इस्रायली सैन्याने ‘आयर्न डोम’ या आपल्या उत्कृष्ट बचावप्रणालीचा प्रभावी उपयोग करीत, या हल्ल्याचा यशस्वी प्रतिकार केला. इस्रायलच्या नेवातिम आणि रेमन या दोन विमानतळांचे, किरकोळ नुकसान होण्यापलीकडे काहीही विशेष घडले नाही. इराणी सैन्याने या कारवाईला नाव तर मोठे झोकदार दिले होते- ‘वादा-ए-सादिक’ म्हणजे ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’. १ एप्रिल २०२४ या दिवशी इस्रायलने सीरियन राजधानी दमास्कस शहतराल्या इराणी वकिलातीवर बाँबहल्ला केला होता. त्यात इराणचे दोन जनरल दर्जाचे अधिकारी आणि इतरही महत्त्वाचे लोक ठार झाले. त्या घटनेचा सूड म्हणून, २४ एप्रिलची ही इराणी कारवाई होती. वैमानिकविरहित विमान किंवा ड्रोन हे तंत्रज्ञान प्रचलित झाल्यापासून, एखाद्या कारवाईत इतक्या मोठ्या संख्येने ड्रोन्स प्रथमच वापरण्यात आली. इराणने तब्बल १७० ड्रोन्स गोलन हाईट्स भागावर सोडली. पण इस्रायलने ती सगळी पाडली.
 
मानवी जीवन व्यवहार किती गुंतागुंतीचे आहे, पाहा. अरब राष्ट्रे आणि इस्रायल यांचे जमत नाही. का? तर अरबांच्या पॅलेस्टाईन प्रदेशातलाच एक भाग ताब्यात घेऊन इस्रायल हा देश निर्माण झाला. भूमध्य समुद्राच्या पूर्व किनार्‍यापासून, हिंदी महासागराच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत पसरलेल्या आणि अरेबियन द्वीपकल्प या नावाने ओळखल्या जाणार्‍या, विस्तीर्ण भूभागात फक्त अरबांचीच वस्ती होती-आहे. हेे सगळे अरब धर्माने मुसलमान आणि पंथाने सुन्नी आहेत. आपल्या या अरेबियन द्वीपकल्पातल्या पॅलेस्टाईन परिसरात, प्राचीन काळी जुडाया नावाचा देश होता. तिथे ज्यू किंवा यहुदी नावाचे लोक राहायचे. त्यांच्यात मोझेस किंवा मूसा नावाचा एक महान प्रेषित होऊन गेला, हे त्यांना मान्य आहे. नंतर, त्याच ज्यू जमातीत जीझस किंवा ईसा नावाचा आणखी एक प्रेषित होऊन गेला, हे देखील त्यांना मान्य आहे. फक्त त्यांचे पुढे एवढेच म्हणणे आहे की, मूसा आणि ईसाच्या नंतर मुहम्मद नावाचा जो प्रेषित होऊन गेला, तो शेवटचा. त्याच्यानंतर कुणीही प्रेषित झाला नाही नि पुढेही होणार नाही. आम्ही त्याचेच एकनिष्ठ अनुयायी आहोत. खरे पाहता संपूर्ण मानवजातीने आमचेच अनुकरण करायला हवे. पण, तुम्ही स्वत: राजीखुशीने तसे करणार नसाल, तर नाइलाजाने आम्हाला तुमच्यावर जबरदस्ती करावी लागेल.
 
आता अशा मनोवृत्तीने जगणार्‍या अरबांच्या स्वत:च्या भूमीच्या अगदी पोटातच इस्रायल हे ज्यू धर्मीय लोकांचे राष्ट्र उभे राहावे, म्हणजे काय? अरबांनी इस्रायलला ’बीखो बुनियाद’ म्हणजे मुळपासून उखडून टाकण्याचा चंग बांधला. या निर्धाराला अरबांकडे असलेल्या अफाट पेट्रो डॉलर्समुळे भलतेच जोरदार आर्थिक पाठबळ लाभले. अरबांच्या मुलखाला लागूनच पर्शिया हा देश. मुहम्मद पैगंबर हे इ. स. ६३२ मध्ये मरण पावल्यावर त्यांचे अनुयायी, इस्लामचा प्रचार-प्रसार करायला बाहेर पडले. इ. स. ६३४ ते इ. स. ६५५ या २१ वर्षांच्या काळात त्यांनी शेजारच्या पर्शिया देशातले झरत्रुष्ट, या प्रेषिताच्या मार्गावर चालणारे ससानियन साम्राज्य जिंकले आणि आणि पर्शियाला पूर्णपणे बाटवून-चुकलो-पर्शियाचे मतांतरण करून त्याला इस्लाममय करून सोडले. पुढच्या काही शतकांच्या काळात मोठा विस्मयकारक प्रकार घडला. आक्रमक अरबी मुसलमान सेनपतींनी पर्शियाच्या उत्तरेला असलेल्या, सगळ्या तुर्कवंशीय टोळ्यांना जिंकून, गुलाम बनवून इस्लामची दीक्षा दिली. हे तुर्क लोक, अरबांपेक्षाही चांगले लढवय्ये होते. अरबांचे सैनिक म्हणून लढाया करता-करता एक दिवस त्यांनी अरबांनाच जिंकून आपले गुलाम बनवले. आता मुसलमानी धर्मप्रमुख आणि राज्यप्रमुख जो खलिफा, त्याची गादी अरबांच्या बगदादहून हलली नि तुर्कांच्या कॉन्स्टन्टिनोपलमध्ये आली अंह! आता कॉन्स्टन्टिनोपल नाही म्हणायचे बरे का! आता म्हणायचे इस्तंबूल!
 
म्हणजे लष्करी नि राजकीयदृष्ट्या तुर्क अरबांच्या वरचढ झाले. पण सांस्कृतिक, भाषिकदृष्ट्या आणखीनच विस्मयकारक प्रकार घडला. अरबी आणि तुर्की या दोन्ही भाषांपेक्षा त्या लोकांच्या संस्कृतींपेक्षा पार्शियन लोकांची भाषा, संस्कृती ही अधिक प्रगत, प्रगल्भ होती. त्यामुळे आशिया, आफ्रिका आणि युरोपचा थोडा भाग एवढ्या विस्तीर्ण भूभागावर पसरलेल्या तुर्कांच्या उस्मानी साम्राज्याची-ऑटोमन एम्पायरची राजभाषा मात्र अरबी किंवा तुर्की नव्हे, तर फारसी आहे, असे दृष्य निर्माण झाले. अर्धा भारत व्यापलेल्या मुघल साम्राज्याचे सुलतान स्वतःला अभिमानाने तुर्क म्हणवीत असत. पण त्यांची दरबारी भाषा फारसी होती. १९व्या शतकाच्या अखेरीस मोटरकारचा शोध लागला. या मोटरकारच्या कम्बश्चन इंजिनासाठी इंधन होते पेट्रोल. आणि ते नेमके या अरबांच्या तुर्कांच्या नि पार्शियनांच्या भूमीतच विपुल होते. तुर्कांच्या साम्राज्यात मोडणारा मोरोक्कोपासून ईजिप्तपर्यंत नि तुर्कस्तानपासून पर्शियापर्यंतचा भाग स्वतःच्या ताब्यात आणण्यासाठी ब्रिटन, फ्रन्स, जर्मनी, आणि रशिया हे सगळेच तुर्क सत्ताधीशांची दाढी कुरवाळू लागले.


हे दाढी कुरवाळण्याचे पैलू तरी किती असावेत! तुमच्या साम्राज्याच्या भूभागात उत्खनन करतो. सोन्याचे हंडे सापडले, तर ते तुमचे. बाकी ज्या काही प्राचीन वस्तू वगैरे सापडतील, त्या आमच्या वा! काय पण ऑफर आहे! पण तुर्क सत्ताधारी त्यावर खूष होते. मार्च १८७९ मध्ये होरमुझ रासम या मूळ असीरियन ख्रिश्चन, पण ब्रिटिश नागरिकत्व घेतलेल्या पुरातत्त्व शास्त्रज्ञाला बॉबिलोनिया परिसरात उत्खनन करताना महान सायरसचा सिलेंडर सापडला. पश्चिमी जगतात एकदम खळबळ उडाली. पश्चिमेतले म्हणजे युरोप-अमेरिकेतले विद्वान विचारवंत, बुद्धिमंत, संशोधक वगैरे लोक आजच्या पश्चिमी संस्कृतीची सुरवात ग्रीकांपासून झाली असे मानतात. त्यामुळे ग्रीकांचा जुन्यात जुना विचारवंत सॉक्रेटिस, त्याचा शिष्य प्लेटो, नि त्याचा शिष्य ऑरिस्टॉटल हे आजच्या पश्चिमी विद्वानांंच्या मते आद्य विचारवंत होत. त्यांच्या पलीकडे इतर कुणाला ते मोजीतच नाहीत. तोच प्रकार योद्धा, मुत्सद्दी वगैरेंबाबत आहे. आजच्या पश्चिमी विद्वानांंच्या मते, ग्रीकांचा अलेक्झांडर आणि रोमनांचा ज्युलियस सीझर ही शौर्य, पराक्रम, सेनापतित्व आणि मुत्सद्देगिरी यांची अंतिम उदाहरणे किंवा मापदंड आहेत. त्यांच्यापलीकडे कुणी जाऊच शकत नाही.

पण गंमत अशी आहे की, अलेक्झांडर आणि ज्युलियस सीझर हे स्वतःच सायरस या त्यांच्यापेक्षाही आधीच्या सम्राटाला ‘ग्रेट’ मानत होते. टॉमस जेफरसन हा अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिणारा, अमेरिकन राज्यघटना लिहिणारा, आणि पुढे स्वतंत्र अमेरिकन राष्ट्राचा अध्यक्ष बनलेला महान विचारवंत. तो देखील ‘सायरस-द-ग्रेट’चा मोठा चाहता होता. झेनोफेन या अलेक्झांडरच्या समकालीन विद्वानाने ‘सायरोपेडिया’ या नावाने दोन खंडांत लिहिलेले सायरसचे चरित्र जेफरसनच्या टेबलावर नेहमी असायचे. जेफरसन १८ व्या शतकात होऊन गेला. सीझर इ.स. पूर्व १ल्या शतकात होऊन गेला. अलेक्झांडर इ. स. पूर्व ४ थ्या शतकात होऊन गेला. ते सगळे जण गोरे होते. सायरस किंवा जुन्या पार्शियन भाषेत कुश्रु किंवा नव्या पार्शियन भाषेत खुस्रु हा पर्शियनचा सम्राट इ. स. पूर्व ६ व्या शतकात होऊन गेला. तो पर्शियन होता, म्हणजेच आशियाई म्हणजेच काळा (युरोपीय गोर्‍यांच्या हिशेबात) असणार. तरीसुद्धा अलेक्झांडर त्याचा चाहता होता. झेनोफेन हा गोरा ग्रीक इतिहासकार, त्याचे चक्क चरित्र लिहितो? मग चला तर आपण त्याला सायरस-द-ग्रेट म्हणूया. पश्चिमी विद्वानांचे लॉजिक हे असे चालते.

असो. तर मार्च १८७९ मध्ये या सायरस-द-ग्रेटचा सिलिंडर सापडला. म्हणजे सिलिंडर किंवा शंकूच्या आकाराची भाजलेल्या मातीची वीट-क्ले टॅब्लेट सापडली. तिच्यावर एक लेख होता. त्याचे वाचन झाल्यावर असे कळून आले की, अकामेनिड घराण्याचा सम्राट सायरस दुसरा याने, इ. स. पूर्व ५६९ मध्ये बॅबिलोनियाचा (आजचा उत्तर इराक) राजा नबोनिडास याचा पराभव केला. नंतर त्याने बॅबिलोनियाने गुलाम केलेल्या अनेक जमातींची गुलामीतून मुक्तता केली. विशेषत: त्याने ज्यू लोकांना जेरूसलेममध्ये परतण्याची परवागनी देऊन, तिथले त्यांचे उद्ध्वस्त मंदिर पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदतही दिली. त्यामुळे ज्यू समुदायाच्या दृष्टीने सायरस एकदम हीरो बनला. त्याचमुळे १४ मे १९४८ या दिवशी इस्रायल हे ज्यू राष्ट्र जन्माला आल्याबरोबर त्याच दिवशी, अमेरिकेने इस्रायलला अधिकृत मान्यता दिली. ही मान्यता इस्रायली अध्यक्ष डेव्हिड बेन गुरियान यांना कळवताना, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन गंमतीने म्हणाले, ‘मी सायरस आहे.’
 
आता पुढची गंमतीची गुंतागुंत पाहा. सायरस हा पर्शियन सम्राट इ. स. पूर्व ६व्या शतकात होऊन गेला. तो ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान किंवा पारशी कुणीच नव्हता. इ. स. पूर्व ५व्या शतकात बहुधा पर्शिया हा पारशी किंवा झरत्रुष्ट्र धर्मानुयायी बनला. इसवी सनाच्या ७व्या शतकात पर्शिया मुसलमान बनला. १९३५ साली रेझा शहा यांनी फतवा काढला की, आमच्या देशाचे नाव यापुढे पर्शिया नसून इराण आहे. इराण या शब्दाचा जुन्या पर्शियन भाषेतला अर्थ आहे. ‘आर्य लोकांची भूमी’. आता स्वत:ला आर्य म्हणवणारे हे इराणी मुसलमान कट्टर शिथा पंथीय आहेत. त्यामुळे सुन्नी अरब आणि इराणी यांच्यातून विस्तव जात नाही. दुसरीकडे इराण्यांना ज्यू लोक पण आवडत नाहीत. त्यामुळे त्यांचे इस्रायलशीही वैर आहे. तिसरीकडे त्यांचे अमेरिकेशीही जमत नाही. कारण अमेरिकेने १९५३ साली इराणचे लोकशाही सरकार उलथवून, मुहम्मद रेझा शहा पहलवी यांचे बाहुले सरकार सत्तेवर आणले होते. आणि तीच अमेरिका इस्रायलची पाठिराखी आहे. आता सायरस सिलेंडर ज्यांच्या ताब्यात आहे, त्या ब्रिटिश म्युझियमने असे ठरवले आहे की, या २०२४ वर्षाच्या उत्तरार्धात केव्हातरी ती सायरस सिलेंडर क्ले टॅब्लेट जेरूसलेममध्ये प्रदर्शित करायची. त्यामुळे इराणचे सांस्कृतिक प्रतिनिधी संतापले आहेत. त्यांनी ब्रिटिश म्युझियमला कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. सायरस सिलेंडर हा इराणचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो तुम्ही आमच्या शत्रूराष्ट्रात प्रदर्शित का म्हणून करणार? भांडायचेच ठरवले की, काहीही मुद्दा चालतो.

 
मल्हार कृष्ण गोखले