खेळ आकड्यांचा...

    07-Jun-2024
Total Views |
Sanjay Raut


१८व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआचे सरकार स्थापन होईल. आता अवघ्या काही महिन्यांतच महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल. लोकसभेची कसर विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढू असे म्हणत, राज्यातील निवडणुकीचे रणशिंगच देवेंद्र फडणवीस यांनी फुंकले आहे. त्यात आता महाविकास आघाडीकडूनही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उबाठाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत मविआ महाराष्ट्रात १८५ जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करुन मोेकळे झाले. महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण जागा २८८ असून, १४५ हा बहुमताचा आकडा. त्यामुळे संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार मविआ बहुमतापेक्षा तब्बल ४० जागा जास्त जिंकेल, असा त्यांना अतिआत्मविश्वास! त्याअनुषंगाने लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पक्षांच्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली असता, कोण किती पाण्यात आहे, हे लक्षात यावे. उबाठा गटाला १६.७२ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला १६.९२ मते मिळाली. मविआत सगळ्यात कमी म्हणजे, १०.२७ टक्के मतांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावे लागले. याउलट राज्यात सत्ताधारी असणार्‍या महायुतीमध्ये, भाजपाला मिळालेली मते ही २६.१८ टक्के असून, शिंदेंच्या शिवसेनेला १२.९५ टक्के, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३.६० टक्के मते मिळवली. लोकसभेच्या या निवडणुकीत मविआची कामगिरी चांगली असली, तरी त्यात काँग्रेस उबाठापेक्षा अव्वल ठरली. काँग्रेसने तब्बल १३ जागांवर विजय मिळवला. तुलनेने २१ जागा लढवून, शिवसेना उबाठा गटाला मात्र ९ जागांवरच समाधान मानावे लागले. या आकडेवारीकडे बघता, विधानसभेची लढतदेखील संजय राऊत म्हणतात तेवढी सहज आणि सोप्पी होणार नाही. कारण, लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेच्या कामगिरीचा अंदाज बांधणे शक्य नसते. मतदार हा सुज्ञपणे लोकसभा आणि विधानसभेला मतदान करत असतो. त्यमुळे संजय राऊत यांचे हे वक्तव्य वातावरणनिर्मितीचाच एख फुटकळ प्रयत्न. प्रत्यक्षात निवडणुकीचे वारे घोंगावू लागले की अनेक प्रश्न नव्याने उपस्थित होतील. ते कोणते? हे मात्र येणारा काळच सांगू शकेल.


सावळा गोंधळ


लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात लगोलग विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत, महायुती आणि मविआ यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. लोकसभेच्या निकालात राज्यात मविआने बाजी मारली. त्यानंतर आता मविआमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली दिसते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, काँग्रेस विधानसभा निवडणुकीत १५० जागा लढवणार असल्याचा दावा ठोकला. एकूण २८८ जागांपैकी काँग्रेस पक्ष जर एकट्याने १५० जागी निवडणूक लढवणार असेल, तर उरलेल्या दोन पक्षांसाठी फक्त १३८ जागाच शिल्लक राहतात. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस हा राज्यात सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयाला आला. परिणामी, त्यांचा आत्मविश्वास दुणावणे तसे साहजिकच! २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडीत १४७ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी अवघ्या ४४ जागांवर जनतेने ‘हाता’ला साथ दिली, तर अखंड शिवसेनेने महायुतीकडून लढताना, १२६ जागा लढवल्या होत्या, तर फुटीपूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२१ जागांवर निवडणूक लढवली होती. सध्या हे दोन्ही पक्ष राज्यात दुभंगले असून, गेल्या विधानसभेची ताकद त्यांच्यापाशी सध्यातरी नाही. मात्र, याचवेळी काँग्रेस अद्याप अभेद्य असून, या निवडणुकीत त्यांनी मविआच्या बळावरच प्रभाव सिद्ध केला आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीनुसार काँग्रेसने १५० जागांवर सांगितलेला दावा हा त्यांच्या सन्मानाचा भाग आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यात काँग्रेस एवढी सक्षम होणे मविआमधील दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या भविष्यासाठी हानिकारकही ठरु शकते. त्यातच पूर्वी युतीत असताना, राज्यात ‘आम्हीच मोठा भाऊ’ याच भूमिकेवरून शिवसेनेने कायमच भाजपशी उघड संघर्ष केला. त्यामुळे कमीपणा घेऊन, काँग्रेसबरोबर लहान भावाच्या भूमिकेत उबाठा वागेल हे शक्य नाही. त्यातच मविआची स्थापनाच मुळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवून झाली. त्यामुळे यंदा काँग्रेसने कितीही डोळे वटारले, पवारांनी ठाकरेंच्या प्रशासकीय कौशल्यावर बोट ठेवले, तरी ठाकरे नमते घेण्याची शक्यता धुसरच. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची स्वप्न काँग्रेसला पडू लागली असली, तरी आघाडीतच त्याला सुरुंग लागण्याची शक्यता अधिक!

 
कौस्तुभ वीरकर