पेटीएम शेअर्समध्ये १० टक्क्यांनी वाढ ' हे ' आहे कारण

युपीआय लाईट ई मॅनडेट अंतर्गत आल्याचा शेअर बाजारात फायदा

    07-Jun-2024
Total Views |

Paytm Upi lite
 
 
मुंबई: One 97 Communications (पेटीएम) कंपनीच्या समभागात आज १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेअर बाजारात आजच्या दिवशी पेटीएमचा समभाग (Share) अप्पर सर्किटवर पोहोचला आहे. या शेअर्समध्ये १० टक्क्यांनी वाढ होत हा ३८१.३० रुपयांवर बंद झाला आहे.
 
मुख्यतः आज पतधोरण समितीचा निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जाहीर केले ज्यामध्ये रेपो दर सातव्यांदा स्थिर ठेवला आहे. परिणामी तो ६.५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. अर्थव्यवस्थेतील विविध मुद्द्यांवर बोलताना दास यांनी फिनटेक धोरणाबाबत देखील भाष्य केले आहे ज्यामध्ये त्यांनी युपीआय लाईट बाबत ई मॅनडेट अंतर्गत हे आणणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे निर्धारित केलेल्या वॉलेटमध्ये मर्यादेहून शिल्लक कमी झाल्यास आपोआप रक्कम भरण्याची सुविधेसाठी आरबीआयने मान्यता दिली आहे.
 
युपीआय लाईटमध्ये यामुळे चालना मिळणार असून सामान्य माणसाला या फिनटेक नियमावलीचा फायदा होणार आहे. युपीआय लाईट छोट्या छोट्या व्यवहारासाठी आणले गेले होते ज्यामध्ये एकावेळी ५०० रुपयांचा व्यवहार व दिवसातून २००० रुपयांचा व्यवहार करण्याची मुभा असते.
 
अधिकृत आकडेवारीनुसार एनएसई व बीएसईत पेटीएम समभागाचे मोठे व्यवहार झाले आहेत. ज्यामध्ये ७.५ अब्ज व्यवहाराची आकडेवारी समोर आली आहे. आजच्या दिवशी ४ लाख शेअर्सचे व्यवहारांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.
 
याविषयी बोलताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले, 'युपीआय लाईटचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, आता ग्राहकांनी त्यांच्या युपीआय लाईट वॉलेटची शिल्लक त्यांच्याद्वारे निर्धारित केलेल्या मर्यादेच्या खाली गेल्यास आपोआप भरण्याची सुविधा सादर करून ते ई-आदेश फ्रेमवर्क अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लहान मूल्याची डिजिटल पेमेंट करण्याची सुलभता वाढेल,' असे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी निवेदनात म्हटले आहे.
 
एनपीसीआय (National Payments Corporation of India) ने दिलेल्या माहितीनुसार, एकूण युपीआय व्यवहारापैकी ८.१ टक्के वाटा पेटीएममार्फत होतो. गेले काही महिने पेटीएम अडचणीत आल्याने कंपनीच्या संचालक मंडळात अनेक बदल झाले होते.