आता आम्ही मोदींसोबतच!

    07-Jun-2024
Total Views |
Narendra Modi news

नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची विकासयात्रा पुढे चालू ठेवण्याचा कौल देशाने दिला असून आता आम्ही तुमच्यासोबतच आहोत, अशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (रालोआ) नेत्यांनी शनिवारी दिली आहे. भाजप – रालोआच्या नवनिर्वाचित खासदारांनी आणि नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय नेता, रालोआ संसदीय नेते आणि लोकसभेच्या नेतेपदी एकमताने निवड केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावास भाजपतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिले. त्याचप्रमाणे रालोआ नेत्यांनीही अनुमोदन देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.

रालोआमध्ये प्रमुख भूमिका असलेले बिहारचे मुख्यमंत्री व जदयुप्रमुख नितीश कुमार आणि तेलुगू देशमचे प्रमुख चंद्राबाबू नाय़डू यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी चंद्राबाबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगाचे शक्तीकेंद्र बनल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात रालोआची सत्ता येण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा मोठा वाटा असल्याचे कबुल केले. राष्ट्रीय व प्रादेशिक आकांक्षामध्ये समन्वय गरजेचा असून तशी दृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असल्याचेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे एन. टी. रामाराव अर्थात एनटीआर यांचे मानवतावादाचे धोरण पंतप्रधान मोदी चालवत असल्याचेही त्य़ांनी सांगितले.

“यावेळी जे कोणी इकडे-तिकडे विजयी झाले आहेत, ते पुढच्या वेळी पराभूत होतील” या नितीश कुमारांच्या वाक्याने हास्याची एकच कारंजी उडाली आणि पंतप्रधान मोदीही खळखळून हसले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात संपूर्ण देशाचा आणि बिहारचाही विकास झाला असून त्यांनी देशाची सेवा केल्याचे नितीश कुमार म्हणाले.रालोआचे सर्वांत तरुण सदस्य म्हणजे लोकजनशक्ती पार्टीचे (रामविलास) चिराग पासवान. राजकारणातील दिग्गज दिवंगत रामविलास पासवान यांचे हे चिरंजीव. देशातील आर्थिक आणि सामाजिक भेद मिटविण्याची क्षमता आणि दृष्टी केवळ मोदींमध्येच असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवी प्रेरणा दिली आहे, असे मत जनसेनेचे पवन कल्याण यांनी व्यक्त केले. यावेळी “पवन नहीं, ये आँधी है” अशा शब्दात पंतप्रधानांनी पवन कल्याण यांचे कौतुक केले तर चिराग पासवान यांच्या पाठीवरही थाप मारली.

भाजप – शिवसेना युती म्हणजे ‘फेवीकॉल का जोड’

आजचा सुवर्णदिन असल्याचे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे आपण मोदींना पाठिंबा देत असून भाजप आणि शिवसेनेची युती म्हणजे ‘फेवीकॉल का जोड’ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झालेला चौफेर विकास पुढेही कायम राहणार असून त्यामुळेच दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना जनतेने घरी बसवल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.