नाना पटोलेंनी उबाठाला पुन्हा डिवचलं, म्हणाले...

    07-Jun-2024
Total Views |
 
Nana Patole
 
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर हुरळून गेलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मित्रपक्षांना, विशेषतः उबाठा गटाला डिवचण्याची मालिका सुरू केली आहे. विधानसभेला १५० जागा जिंकण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांनी मविआत काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा दावा करीत, लहान भावांनी लहान भावांसारखे वागावे, असा खोचक टोला लगावला आहे.
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “आम्ही लोकसभा निवडणुकीतदेखील मोठ्या भावाची भूमिका निभावली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्याबरोबर असलेले आधी गट होते; आता पक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात आमचा जेव्हा एक खासदार होता, तेव्हाही आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे. आजही निभावत आहोत. मात्र, लहान भावांनी लहान भावांसारखे वागावे”.
 
जो जिंकेल, त्याची जागा : संजय राऊत
 
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नाही. महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. आम्ही अत्यंत संघर्षातून आणि संकटातून पक्ष उभा केला आहे. काँग्रेससमोर तसे संकट नव्हते. त्यांचे चिन्ह आणि पक्ष हा त्यांच्याकडे होता. आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे. आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा, असे ठरले आहे”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.