मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार यांनी भरला उमेदवारी अर्ज!

भाजपकडून भव्य शक्तिप्रदर्शन; मंत्री मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड यांची उपस्थिती

    07-Jun-2024
Total Views |
 
Kiran Shelar
 
मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण रवींद्र शेलार (Kiran Shelar) यांनी शुक्रवार, दि. ७ जून रोजी कोकण विभागीय आयुक्तालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप नेते आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राणे, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, सुषम सावंत, राजेश शिरवाडकर, शरद चिंतनकर, संतोष मेढेकर यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
 
विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता दि. २६ जून रोजी मतदान होणार असून, भाजपने किरण शेलार यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबई असलेल्या शेलार यांचे बालपण बीडीडी चाळीत गेले. वरळीतील मराठा हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पार पडले. मास्टर्स ऑफ आर्ट्स (जर्नलिजम) मधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठी पत्रकारितेचा २४ वर्षांचा दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्याशिवाय मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ओळखले जाते. मुंबईतील सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो.
 
घोषणांनी दणाणले बेलापूर!
 
किरण शेलार यांनी सीबीडी बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजपकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आयुक्त कार्यालय परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'किरण शेलार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!, 'हमारा नेता कैसा हो, किरण शेलार जैसा हो', अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
 
याप्रसंगी बोलताना किरण शेलार म्हणाले की, "मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपचा नोंदणीचा आकडा हा अन्य कुठल्याही पक्षापेक्षा अधिक आहे. मुंबईत भाजपचा कोअर व्होटर मोठा आहे. या मतदाराला मध्यवर्ती ठेवून आम्ही नोंदणी केलेली आहे. आमचा हा मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरेल, अशी खात्री आहे. त्यामुळे विजय निश्चित मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.