मलबार हिल परिसरतील जलाशय तोडले जाणार नाहीत - कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य विकास विभागाची पुढील ३ महिन्यांची रूपरेषा जाहीर

    07-Jun-2024
Total Views |
Mangal Prabhat Lodha News
 
मुंबई : मुंबई शहरात आपल्या हातात उरलेल्या मोकळ्या जागांपैकी हँगिंग गार्डन ही एक महत्वाची जागा आहे. या जागेचा वापर करणाऱ्या नागरिकांचा आणि त्या ठिकाणी असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आपण आदर करायला हवा. येथील झाडांची कत्तल न करता जलाशयाची दुरुस्ती होऊ शकते. त्यासाठीच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी निवडलेले टेंडर रद्द करण्यास पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. सदर प्रक्रिया पुढील काही दिवसात पूर्ण होईल असे कॅबिनेट मंत्री आणि मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
 
नागरिकांचा पुनर्बांधणीसाठी असलेला विरोध, निर्णय प्रक्रियेमध्ये गेलेला वेळ आणि तज्ञांचे मत या सर्वांचाच विचार करता, मलबार हिल येथील जलाशयाची पुनर्बांधणी न करता आतमधल्या बाजूने दुरुस्ती करावी तसेच या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे झाडांची कत्तल अथवा निसर्ग सौंदर्याचा विध्वंस होणार नाही, याची काळजी घ्यावी असे निर्देश मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे महापालिकेला दिले आहेत.

तसेच या पत्रकार परिषदेमध्ये कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य, उद्योजकता रोजगार आणि नाविन्यता विभागाची पुढील ३ महिन्यांची रूपरेषा जाहीर केली आहे. सदर रूपरेषा पुढीलप्रमाणे.

१. १० जून २०२४ पासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शाहू महाराज करियर मार्गदर्शन शिबीर राबविण्यात येणार आहे. १० जून रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील पंडित भीमसेन जोशी कला मंदिरात संपन्न होणार आहे.

२. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशातील सर्व स्टार्टअपची २ दिवसीय कॉन्फरन्स मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

३. राज्यातील १५० ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित करण्याचा कार्यक्रम ८ जुलै २०२४ पासून सुरु होणार आहे. हे मेळावे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पूर्ण होणार आहेत.

४. राज्यातील प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी उभारण्यात येत आहे. याद्वारे राज्यातील युवकांना विदेशात नोकरी मिळण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहेत.

५. भारतातील ५ महसुली विभागात स्वच्छ भारत अकादमी उभारण्यात येणार आहे.

६. राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.

७. राज्यातील १००० ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कैशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.

८. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.