काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये 'हमारे बारह'वर बंदी; मुस्लिम संघटनांनी केली होती बंदीची मागणी

    07-Jun-2024
Total Views |
 hamare barah
 
बंगळुरू : मुस्लीम महिलांचे समाजातील वास्तव दाखवणाऱ्या 'हमारे बारह' या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. विविध मुस्लिम संघटनांच्या तक्रारी आल्यानंतर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या म्हणण्यानुसार, "कर्नाटक सिनेमा (नियमन) कायदा, १९६४ च्या कलमांनुसार, कर्नाटक सरकारने 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रसारणावर किंवा रिलीजवर दोन आठवड्यांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे."
 
एएनआयच्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, या प्रकरणी सरकारचे म्हणणे आहे की, याला राज्यात रिलीज करण्यास परवानगी दिल्यास जातीय तणाव निर्माण होईल. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक अल्पसंख्याक संघटना आणि शिष्टमंडळांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे.
 
 
कर्नाटक सरकारच्या या निर्णयापूर्वी ‘हमारा बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरही मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र नंतर ही बंदी उठवण्यात आली आहे. न्यायालयाने यापूर्वी निर्मात्यांना दि. १४ जून २०२४ पर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यास सांगितले होते. या प्रकरणी अझहर तांबोळी यांनी चित्रपट थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी चित्रपटाविरोधात कायदेशीर हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. याशिवाय चित्रपटाच्या विषयाला आव्हान देण्यात आले असून त्यात इस्लामिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.
 
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चे वकील अद्वैत सेठना यांनी या दाव्यांचे खंडन केले आणि म्हणाले की सीबीएफसी समितीने चित्रपटाची तपासणी केल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. प्रमाणपत्र देण्यापूर्वी अनेक सीन्स एडिट करण्यास सांगितले होते. ते म्हणाले होते की CBFC चित्रपटाच्या सीमा नियंत्रित करते परंतु प्रसिद्धी आणि ट्रेलरवर त्यांचे नियंत्रण नाही.
 
न्यायालयाचे यापूर्वीचे निर्देश अनेक घटनांनंतर देण्यात आले होते. या घटनांमध्ये केवळ इस्लामिक संघटनांचा विरोधच नाही तर मुख्य अभिनेते अन्नू कपूर यांना जीवे मारण्याच्या धमकी कट्टरपंथीयांकडून देण्यात आली होती.