प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको…

एसटीमध्ये "युपीआय" प्रणालीला प्रवाशांची पसंती

    07-Jun-2024
Total Views |
image 20 
 
मुंबई :एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करण्याची गरज नाही. कारण एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना 'युपीआय ' प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी सर्व वाहकांना ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्सदेखील देण्यात आल्या आहेत. या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येते.
 
जानेवारी २०२४ ते मे २०२४ अखेर १४ लाख ३२ हजार तिकीटांची विक्री झाली असून यातून गेल्या ५ महिन्यात ३५ कोटी ८७ लाख १५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. निश्चलनीकरणाच्या (कॅशलेस) दृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे या सारख्या युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली. वाहकाच्या ॲड्राईड तिकीट मशीन वर असलेल्या क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे.
 
अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच, सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा वाद असे प्रश्न कायमचे मिटले आहेत. या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन केवळ ३ हजार ५०० तिकीटे युपीआयव्दारे काढली जात होती. त्यामध्ये मे, २०२४ मध्ये पाचपट वाढ होऊन प्रतिदिन २० हजार ४०० तिकीटे सरासरी काढली जात आहेत. अर्थात, युपीआय पेमेंटव्दारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ते जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १० लाख रुपये होते, आता मे, २०२४ मध्ये ४५ लाख रूपये प्रतिदिन झाले आहे.
 
 प्रवाशांनी प्रवासादरम्यान नेहमी वाहकाकडे युपीआय तिकीटाची मागणी करावी जेणेकरून सुटया पैशावरून होणारे वादविवाद टाळले जातील. सहाजिकच आपला प्रवास सुखकर व समाधानकारक होईल. युपीआय पेमेंटव्दारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.