मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण शेलार उद्या भरणार उमेदवारी अर्ज!

    06-Jun-2024
Total Views |
Kiran shelar


मुंबई :
मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण रवींद्र शेलार हे शुक्रवार, दि. ७ जून रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता दि. २६ जून रोजी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपने किरण रवींद्र शेलार यांना मुंबई पदवीधर, निरंजन डावखरे कोकण पदवीधर आणि शिवनाथ दराडे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
 
भाजपचे उमेदवार किरण रवींद्र शेलार आणि निरंजन डावखरे हे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मुंबईत यंदा १ लाख १६ हजार ९२३ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली. त्यापैकी मुंबई शहर ३१ हजार २२९, तर मुबंई उपनगरातील पदवीधर मतदारांची संख्या ८५ हजार ६९४ इतकी आहे. जन्मभूमी आणि कर्मभूमी मुंबई असलेल्या किरण रवींद्र शेलार यांचे बीडीडी चाळीत बालपण गेले. वरळीतील मराठा हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. मास्टर्स ऑफ आर्ट्स (जर्नलिजम) मधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.

मराठी पत्रकारितेचा २४ वर्षांचा दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्याशिवाय मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ओळखले जाते. मुंबईतील सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. मुंबई पदवीधर त्यांची लढत ’उबाठा’ गटाच्या अनिल परब यांच्याशी होणार आहे.निरंजन डावखरेही भरणार अर्जकिरण शेलार यांच्यासोबत कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे देखील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११.३० वाजता अर्ज दाखल करणार आहेत. ते गेली दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यंदा ते हॅट्ट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. या मतदारसंघात आतापर्यंत २ लाख १४ हजार मतदारांची नोंदणी झाली असून, भाजपकडून शहरांबरोबरच गावा-गावांमध्ये संपर्क साधण्यात येत आहे.