नव्या कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी

    06-Jun-2024
Total Views |
New Labor Law


लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया व आचारसंहिता यामुळे नव्या कामगार कायद्यांशी संबंधित विषय काहीसा बाजूला पडणे स्वाभाविक होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाल्याने कामगार-व्यवस्थापन या उभय क्षेत्रांशी संबंधित अशा या विषयाला नव्याने चालना मिळणे अपेक्षित असून, त्यादृष्टीने उद्योग व्यवस्थापन क्षेत्रात नव्या कामगार कायद्यांच्या पूर्वतयारीचा कानोसा घेणे समयसूचक ठरते.

उद्योगांतर्गत आपल्या देशातील कामगार-व्यवस्थापन क्षेत्रातील गेल्या पाच वर्षांतील एक महत्त्वपूर्ण व दूरगामी स्वरूपातील परिणामकारक ठरणारी घटना म्हणजे, देशातील प्रमुख २९ कामगार कायद्यांची फेररचना करून, नव्या चार कामगार कायद्यांचे केंद्र सरकारने तयार केलेले प्रारूप व त्याला संसदेने दिलेली मान्यता. सप्टेंबर २०२० मध्ये केंद्र सरकारने प्रस्थापित व जटिल स्वरूपातील कामगार कायद्यांना सूत्रबद्ध करून त्यांची औद्योगिक संबंधविषयक, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा तास आणि नोकरीच्या सेवा-शर्ती अशी सुटसुटीत विभागणी केली आहे. या नव्या कामगार कायद्यांचा तपशील, त्याअंतर्गत नियम व संबंधित पद्धती इत्यादीवर केंद्र सरकार स्तरावर यापूर्वीच विचारविमर्ष झाला असून, काही राज्यांनी या कायद्यांची अंमलबजावणी विविध टप्प्यांमध्ये सुरू केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया व आचारसंहिता यामुळे नव्या कामगार कायद्यांशी संबंधित विषय काहीसा बाजूला पडणे स्वाभाविक होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाल्याने कामगार-व्यवस्थापन या उभय क्षेत्रांशी संबंधित अशा या विषयाला नव्याने चालना मिळणे अपेक्षित असून, त्यादृष्टीने उद्योग व्यवस्थापन क्षेत्रात नव्या कामगार कायद्यांच्या पूर्वतयारीचा कानोसा घेणे समयसूचक ठरते. नव्या राजकीय पार्श्वभूमीवर नव्या कामगार कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींमध्ये पुढील मुद्दे आणि तरतुदींचा प्रामुख्याने समावेश आहे.
 
आस्थापनांतर्गत स्थायी आदेश
नव्या कामगार कायद्यांतील तरतुदींनुसार, ज्या व्यवसाय आस्थापनांमध्ये ३०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत, अशा आस्थापनांना स्थायी आदेश लागू होणार नाहीत. अशा आस्थापनांना आता आपल्या कर्मचार्‍यांसाठी स्वतःचे नियम व सेवा-शर्ती बनवाव्या लागतील.
विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती
खासगी क्षेत्रांतर्गत सर्व कंपन्यांना विशिष्ट काळासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करता येईल. यामुळे विशिष्ट प्रकारच्या वा अचानक वाढलेल्या व्यावसायिक गरजांसाठी अशा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याची मुभा राहील.
कामगार संघटना
ज्या आस्थापनांमध्ये अद्याप कामगार संघटना नाही, अशा ठिकाणी कामगार संघटनेची स्थापना झाल्यावर संबंधित कामगार संघटनेला मान्यताप्राप्त करून चर्चा करण्याचा अधिकार प्राप्त करावा लागेल. व्यवस्थापनाला अशा दर्जाप्राप्त कामगार संघटनेशी चर्चा करावी लागेल.
एकाहून अधिक कामगार संघटना
आस्थापनेतील काही कामगारांनी दुसर्‍या कामगार संघटनेचे सदस्यत्व घेतल्यास नव्या कामगार कायद्यांमध्ये कामगार संघटनांच्या संयुक्त वाटघाटी करणार्‍या मंचाची तरतूद आहे. त्याचप्रमाणे एकाहून अधिक कामगार संघटना असल्यास, ज्या कामगार संघटनेकडे ५१ टक्के कामगारांची सदस्यता असेल, अशा कामगार संघटनेला कामगारांसाठी चर्चा करणारी एकमेव कामगार संघटनेचा दर्जा प्राप्त होईल. एखाद्या ठिकाणी कामगार संघटनेकडे ५१ टक्के सदस्यता नसल्यास, ज्या कामगार संघटनांकडे कमीतकमी २० टक्के कामगार सदस्यता असेल, अशा संघटनांचे मिळून कामगारांच्या मुद्द्यांवर चर्चा व वाटाघाटी करण्यासाठी संयुक्त मंचाची स्थापना केली जाईल.
संप व टाळेबंदी
कामगार संघटनांना संप व व्यवस्थापनाला टाळेबंदी लागू करण्यासाठी ६० दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागेल. नव्या तरतुदींनुसार उभयपक्षी समेटचर्चा सुरू असताना संप वा टाळेबंदी लागू करता येणार नाही. याशिवाय अचानकपणे केलेला संप वा टाळेबंदीसुद्धा बेकायदेशीर ठरू शकते.
आस्थापना बंद करण्यासाठी पूर्वपरवानगी
ज्या कारखाना अथवा आस्थापनेत ३०० पेक्षा कमी कामगार असतील, अशांना आपल्या आस्थापनेत काम-स्थगिती कामावरून कामगारांना कमी करणे अथवा आस्थापना बंद करण्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता राहणार नाही.
कामगार कौशल्य निधी
नव्या कामगार कायद्यांतर्गत नव्या तरतुदींनुसार ज्या आस्थापनेतून कामगारांना कमी केले जाईल, अशा प्रत्येक कामगाराच्या शेवटच्या मासिक पगाराच्या अर्धी रक्कम संबंधित व्यवस्थापनाद्वारे कामगार कौशल्य निधी म्हणून दिली जाईल.
कामगार तक्रार निवारण समिती ज्या आस्थापनांमध्ये २० पेक्षा अधिक कामगार आहेत, त्याठिकाणी कामगार तक्रार निवारण समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये कामगार व व्यवस्थापनाचे मिळून दहा सदस्य असतील. समितीचे अध्यक्षपद कामगार व व्यवस्थापनामध्ये आळीपाळीने दिले जाईल.
तक्रार निवारण़ समितीमध्ये तक्रारीचे निराकरण न झाल्यास संबंधित कामगार आपल्या कामगार संघटनेच्या माध्यमातून समेट अधिकार्‍यांकडे दाद मागून शकेल.
वेतन व भत्ते
कामगारांना मासिक वेतनामध्ये त्यांचे मूळ वेतन, महागाई भत्ता व रिटेन्शन अलावन्स यांचा समावेश असेल व त्यांच्या मासिक वेतनापैकी ५० टक्के रक्कम ही वरील स्वरूपात देण्यात येईल. आस्थापनांना त्यादृष्टीने गरजेनुरूप फेरविचार करावा लागेल.
फ्लोेअर वेज
केंद्र सरकारतर्फे विभिन्न भौगोलिक क्षेत्रांसाठी ‘फ्लोअर वेज’ घोषित करेल, त्याआधारे राज्य सरकार संबंधित कामागारांसाठी किमान वेतन निश्चित करेल.
बेकायदा संपासाठी वेतन कपात
ज्या आस्थापनेमध्ये दहा अथवा त्याहून अधिक कामगारांनी संप केला असेल, अशा कामगारांच्या मासिक वेतनातून आठ दिवसांची वेतनकपात केली जाऊ शकेल.
कंत्राटी कामगार
कंत्राटी कामगार पद्धतीअंतर्गत ज्या आस्थापनांमध्ये ५०पेक्षा अधिक कंत्राटी कामगार असतील, अशांना कंत्राटी कामगार कायद्यांतर्गत पंजीकरण करावे लागेल.
कंत्राटी परवाना
जो कंत्राटदार ५० हून अधिक कंत्राटी कमागार ठेवत असेल, त्यांना कंत्राटी परवाना घेणे अनिवार्य असेल. या परवान्याचा कालावधी पाच वर्षांपर्यंत असेल व विविध राज्यांमध्ये कंत्राटी सेवा देणार्‍या कंत्राटदारांना केंद्र सरकारकडून बहुराज्यीय परवाना घेता येईल.
मुख्य प्रक्रियेत कंत्राटी कामगार
आस्थापनेतील मुख्य मूलभूत प्रक्रियेमध्ये काम करण्यासाठी कंत्राटी कामगार घेता येणार नाहीत. अनुषंगिक प्रक्रिया पद्धतींची यादी व तपशील नव्या कामगार कायद्यांतर्गत जारी केली जाईल.
कंत्राटी कामगारांसाठी आवश्यक बाबी
मुख्य नियोजन म्हणून आस्थापनांना कंत्राटी कामगारांसाठी आरोग्य, सुरक्षा, कामाचे तास, कल्याणकारी सुविधा इ. पुरवाव्या लागतील. याशिवाय, कंत्राटदाराद्वारे त्यांच्याकडे काम करणार्‍या कामगारांना ते नोकरी सोडून गेल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
आंतरराज्य कंत्राटी कामगार
आस्थापनांमध्ये अन्य राज्यांमधून कंत्राटी पद्धतीने काम करण्यासाठी आलेल्यांची नोंद ठेवावी लागेल. अशांना कामावर रुजूू होण्यासाठी त्यानंतर दरवर्षी कामाच्या ठिकाणाहून त्यांच्या राज्यात जाण्या-येण्यासाठी भाडे प्रवासखर्च म्हणून द्यावा लागेल.
कारखान्याची व्याख्या
ज्या आस्थापनेमध्ये विजेच्या वापरासह २० व विजेच्या वापराशिवाय ४० कामगार काम करीत असतील, अशा आस्थापनांचा समावेश कारखाना म्हणून होईल.
कॅन्टीन
ज्या आस्थापनांमध्ये १०० हून अधिक कामगार असतील, अशा ठिकाणी कॅन्टीनची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल.
कल्याण अधिकारी
ज्या कारखान्यांमध्ये २५० हून अधिक कामगार काम करीत असतील, अशा ठिकाणी कल्याण अधिकार्‍यांची नेमणूक करावी लागेल. बांधकाम व भवन निर्माण क्षेत्रात २५० हून अधिक कामगार काम करीत असल्यास कल्याण अधिकारी नेमावा लागेल.
कारखाने निरीक्षक व समन्वयक
कारखाने निरीक्षक व मुख्य कारखाने निरीक्षक यांचे पदनाम ‘कारखाना निरीक्षण व समन्वयक’ व ’मुख्य कारखाने निरीक्षक व समन्वयक’ असे राहील. त्यांच्यावर नव्या कायद्यांतर्गत तपशील व तरतुदी सर्व आस्थापना, व्यवस्थापन व कामगारांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असेल.
भोगवटाधारक
नव्या नियम व तरतुदींनुसार कंपन्यांना त्यांच्या स्वायत्त संचालकांना भोगवटादार म्हणून निर्देशन करता येणार नाही.
व्यवस्थापनाच्या जबाबदार्‍या
व्यवस्थापनाच्या मुख्य जबाबदार्‍यांमध्ये कामगारांची वार्षिक आरोग्य तपासणी प्रत्येक कामगाराला संबंधित राज्याचे नियम व तरतुदींनुसार नियुक्तीपत्रे देणे. इ.चा प्रामुख्याने समावेश असेल.
वार्षिक अर्जित रजा
ज्या कामगारांनी वर्षात १८० दिवस काम केले असेल, अशांना नव्या नियमांनुसार २० दिवसाला १ दिवस याप्रमाणे वार्षिक अर्जित रजा मिळेल. सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे नव्या चार कामगार कायद्यांमुळे उद्योग-व्यवस्थापन व कामगार क्षेत्रांशी संबंधित कामगार कायदे व तरतुदींमध्ये सुसूत्रता आणण्याचा मोठा प्रयास करण्यात आला आहे. बदलत्या काळानुरूप कायद्यांमध्ये बदल हे तत्त्व यासंदर्भात अमलात आणले गेले आहे. या बदलांपोटी कायदेशीर तरतुदी, त्याचे फायदे व अंमलबजावणी यासंदर्भात शासन-प्रशासन, व्यवस्थापन व कामगार या घटकांचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. या नव्या कामगार तरतुदींची अंमलबजावणी करताना प्रशासनिक वा कायदेशीर तरतुदींच्या जोडीलाच आर्थिक संदर्भ व स्वरूपातील बदल केले आहेत. या सार्‍या बदलांचे स्वरूप, महत्त्व व गांभीर्य लक्षात घेता, उद्योग व्यवस्थापन व कामगार आणि कामगार संघटना या सर्व संबंधित घटकांनी यासंदर्भात पुरेशी पूर्वतयारी करणे आवश्यक ठरते. कारण, या पूर्वतयारीवरच नव्या कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीचे यश अवलंबून राहणार आहे.
 
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)