उत्तर प्रदेशची मायावतींवरील माया पातळ!

देशभरातून अवघे नऊ टक्के मतदान

    06-Jun-2024
Total Views |
 
image18
 
मुंबई :  लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाचा निकाल हा सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. एकूणच पाहता, उत्तर प्रदेशातील निकालाची आकडेवारी ही नक्कीच धक्कादायक अशीच म्हणावी लागेल. उत्तर प्रदेशात भाजप, सपा आणि काँग्रेस यांनी काय कमावले अथवा गमावले, याची चर्चा सुरु असताना, मायावतींच्या बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाचीदेखील कामगिरी निराशाजनक असल्याचे दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मायवतींच्या बसपाला साधे खातेदेखील उघडता आलेले नाही. त्यात या पक्षाच्या मतदानातसुद्धा घट नोंदवण्यात आली आहे.
 
यंदा बसपला देशभरातून एकूण 9.36 टक्के मतदान मिळाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला 19.77 टक्के मते मिळाली, असली तरीही एकाही जागेवर त्यांचा विजय मिळाला नव्हता, तर 2019च्या निवडणुकीत बसपाने सपाबरोबर युती केली होती. त्यावेळीही बसपाला मिळणार्‍या मतदानात घट होऊन बसपाला, 19.43 टक्केच मते मिळाली. असे असले तरीही दहा जागांवर बसपाचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी मात्र बसपाला मतदारांनी नाकारलेले दिसते. या निवडणुकीत एकीकडे ‘इंडी’ आघाडी आरक्षण आणि संविधान रक्षण या मुद्द्यांवर भाजपला वारंवार लक्ष्य करत असताना, मायावतींनी या मुद्द्यांवर अतिशय मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे कुठलाही ठोस अजेंडा नसल्यामुळे मतदारही बसपाकडे आकर्षित झाला नाही. तसेच, उमेदवार घोषित करताना केलेली दिरंगाई, आयत्यावेळी बदललेले उमेदवार यामुळेदेखील मतदारांमध्ये योग्य संदेश गेला नाही.
 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्येदेखील बसपाची कामगिरी सतत खालवणारी राहीली आहे. 2012 च्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत मायावती यांच्या बसपाला 25.91 टक्के मते मिळाली होती, त्यावेळी बसपाने 80 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या 2017 सालच्या निवडणुकीत बसपला 22.23 टक्के मते मिळाली, तसेच 19 उमेदवार विजयी झाले. त्यानंतर झालेल्या 2022 च्या लढतीत, बसपाला 12.88 टक्केच मते मिळाली आणि अवघा एक उमेदवार त्यांचा निवडून आला.
पुतण्याला अचानक हटविले बसपाचे भविष्यातील सर्वेसर्वा म्हणून पुढे आलेल्या, मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद यांनाही निवडणूककाळात अचानक पदावरून हटविल्याने, बसपाचा युवा मतदार दुखावला गेला.
 
या सगळ्याचा विपरीत परिणाम म्हणजे, मायावती यांच्या पक्षाला 2014 पेक्षाही मानहानीकारक पराभव यंदा स्वीकारावा लागला.
मुसलमानांना बसपा विचारपूर्वक प्रतिनिधित्व देईल  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आणि यापूर्वीच्याही निवडणुकांमध्ये बसपाने मुसलमानांना पुरेसे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. पण, त्याबदल्यात आम्हाला मिळालेला प्रतिसाद अतिशय अल्प असाच आहे. त्यामुळे यापुढे पक्षाचे हित लक्षात घेऊनच, विचारपूर्वक मुसलमानांना बसपा प्रतिनिधित्व देईल.