डोंबिवलीतील अतिधोकादायक कंपनी स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर

संघर्ष समिती घेणार कामा संघटनेची भेट

    06-Jun-2024
Total Views |
स्फोट
 
डोंबिवली : ( प्रतिनिधी) अंबर (अमुदान) कंपनी स्फोटप्रकरणानंतर अतिधोकादायक रासायनिक कारखान्याचे स्थलांतरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कंपनी स्थलांतरांच्या बाबतीत कामा या औद्योगिक संघटनांची बैठक घेणार असल्याची माहिती 27 गाव ‘सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती’चे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली. ‘सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती’च्या वतीने दि. 26 मे 2016 प्रोबेस कंपनी स्फोटप्रकरणातील आणि दि. 23 मे 2014 अंबर (अमूदान) कंपनी स्फोटप्रकरणातील डोंबिवली येथील बाधितांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ही माहिती वझे यांनी दिली.
 
संघर्ष समिती ‘एमआयडीसी’ अधिकारी, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’तील अधिकारी यांच्यासह ‘कामा’ संघटनेची भेट घेणार आहे. याबाबत मानपाडा पोलीस स्थानकात माहिती देऊन नंतर ही बैठक घेतली जाणार आहे. यावेळी गंगाराम शेलार, विजय भाने, गजानन मांगरूळकर, दत्तात्रय वडो, बाळाराम ठाकूर, भगवान पाटील, महेश पाटील, बंडू पाटील, जालिंदर पाटील, भास्कर पाटील, रतन पाटील, बाळकृष्ण जोशी, गणेश म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, राजीव तायशेटे, माधव चिकोडी, अ‍ॅड. शिवराम गायकर, शरद पाटील, विश्वनाथ रसाळ, वासुदेव गायकर, मुकुंद म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, अभिमन्यू म्हात्रे, ज्ञानेश्वर माळी, वासुदेव पाटील, बुधाजी वझे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी वझे म्हणाले की, “कामाने 2016मध्ये देखील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करू नये, अशी भूमिका घेतली होती. त्या स्फोटात अनेकांना आपला जीव गमावावा लागला. त्यानंतर आता 12 जणांचा जीव गेला असून 68 जण जखमी झाले आहेत. आता अजून कोणाचा जीव जाईल, याची वाट आम्ही पाहायची का?, शासनाने अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करण्याची भूमिका घेतली आहे. उद्योजकांनी आयटी कंपन्या किंवा कारखाने आणावेत. म्हणजे त्यांचे ही काही नुकसान होणार नाही. कंपन्यांचे स्थलांतर झाले नाही, तर संघर्ष समिती पुढीची भूमिका स्पष्ट करेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

स्फोटग्रस्तांच्या मदतीसाठी समिती स्थापन करणार “प्रोबेस कंपनीग्रस्तांना अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही. तसेच आता अंबर कंपनीत ही स्फोट झाला आहे. या स्फोटग्रस्तांना त्वरीत मदत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी मानपाडा पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी यांच्या सतत बैठकी घेऊ. सध्या सरकाराला मदत देण्यासाठी काही वेळ दिला आहे. तसेच याप्रकरणी एका समितीची स्थापना करू,” असेही वझे यांनी सांगितले.