रोहित पवारांच्या दाव्यावर तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, "जाणीवपूर्वक..."

    06-Jun-2024
Total Views |

Tatkare & Pawar 
 
मुंबई : आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. केवळ जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. यावर आता तटकरेंनी प्रत्युत्तर दिले.
 
सुनील तटकरे म्हणाले की, "केवळ जाणीवपुर्वक या अफवा पसरवल्या जात आहेत. एका निवडणुकीत जे काही वातावरण महाराष्ट्रात तयार झालं, त्यात यश मिळाल्यामुळे काही माणसं हुरळून जातात ही गोष्ट खरी आहे. परंतू, निवडणूकीच्या कालावधीतसुद्धा कुणी फेक व्हिडीओ तयार केले, कशा पद्धतीने आणि कुठल्या लोकसभा मतदारसंघात ते प्रसारित केले या सगळ्याची माहिती आमच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार एकसंघ आणि दादांच्या नेतृत्वावर ठामपणे विश्वास ठेवून आहेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  निलेश लंकेंच्या पीएवर जीवघेणा हल्ला!
 
तसेच आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वासोबत बसून योग्य तो निर्णय घेतील, असेही ते यावेळी म्हणाले.