रविंद्र वायकरांच्या विजयामागे टपाली मते ठरली निर्णायक!

"ईव्हिएम" मोजणीत कीर्तिकर एका मताने आघाडीवर; टपालातील ४९ मते वायकरांच्या बाजूने

    06-Jun-2024
Total Views |
Ravindra Waikar news


मुंबई :
शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची लढत झालेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघात टपाली मतांमुळे कौल बदलला आहे. 'ईव्हिएम' मोजणीत उबाठा गटाचे अमोल कीर्तिकर हे केवळ एका मताने आघाडीवर होते. मात्र, टपाली मतांचा कल जाहीर होताच शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी आघाडी घेतली आणि अवघ्या ४८ मतांनी ते विजयी ठरले.
 
उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवार, दि. ५ जून रोजी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. त्यानुसार, या मतदारसंघात ईव्हिएममधील मतमोजणीच्या २६ फेऱ्या झाल्या. अंतिम फेरीत अमोल कीर्तिकर हे एका मताने आघाडीवर होते. ईव्हिएममधील मतांची मोजणी संपल्यानंतर टपाली मतपत्रिकांच्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात कीर्तीकर यांना १ हजार ५०१, तर रवींद्र वायकर यांना १ हजार ५५० मते प्राप्त होती. नियमाप्रमाणे टपाली मतपत्रिकांची संख्या 'ईव्हीएम' मतमोजणीच्या सर्व फेऱ्यानंतर जाहीर केली जाते. त्यानुसार, वायकर हे ४८ मतांनी आघाडीवर राहिले.

१११ मते बाद

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी अखेर जर आघाडीच्या दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमधील फरक बाद टपाली मतपत्रिकांच्या संख्येपेक्षा कमी असेल, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतःहून सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत बाद टपाली मतपत्रिका पुनर्परीक्षण करणे बंधनकारक आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात बाद टपाली मतपत्रिकांची संख्या १११ इतकी असल्याने या सर्व बाद मतपत्रिकांचे पुनर्परीक्षण उमेदवारांच्या उपस्थितीत करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. तपासणीअंती टपाली मतपत्रिकांच्या मोजणी संख्येत काहीही फरक पडला नाही.

कीर्तिकरांनी घेतली नाही मुद्देसूद हरकत

टपाली मतांचा कौल समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रवींद्र वायकर यांच्या विजयाची घोषणा सायंकाळी ७.५३ वाजता केली. त्यावर, कीर्तीकर यांच्या प्रतिनिधींनी ८.०६ वाजता पुनर्मतमोजणीचे लेखी पत्र सादर केले. त्यांनी घेतलेली हरकत ही विहित मुदतीनंतर होती. त्यांनी कोणतीही मुद्देसूद हरकत घेतलेली नव्हती. तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया तसेच 'व्हीव्हीपॅट' मोजणी दरम्यान कोणतीही हरकत घेण्यात आली नव्हती, असे मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.