देशातील जनतेचा राहुल गांधींवर विश्वास नाही – पियुष गोयल

गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न दुर्दैवी

    06-Jun-2024
Total Views |
Goyal
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेची वेगवान वाटचाल होत आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश असून राहुल गांधी यांना हे सहन होत नाही. त्यामुळेच ते गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत केला आहे. शेअर बाजारमध्ये मोठ्या घटनांच्या वेळी बदल होत असल्याचे नेहमी घडत असते. त्यामुळे दीर्घकाळात शेअर बाजारामध्ये कसे बदल झाले, हे बघणे आवश्यक ठरते.
 
मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळात आपल्या मार्केट कॅपने प्रथमच 400 लाख कोटी रुपयांचा विक्रम गाठला आहे, याची देशातील गुंतवणूकदारांना माहिती आहे. मोदी सरकारच्याच काळात सरकारी उद्योगांची मार्केट कॅप चार पटीने वाढले आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या भारताचे मार्केट कॅप फक्त 67 लाख कोटी रुपये होते. आज ते 415 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या दहा वर्षांत 348 लाख कोटी रुपयांची ही वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांचा मोदी सरकारवर विश्वास असल्याचे पियुष गोयल यांनी स्पष्ट केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शेअर बाजाराविषयी केलेल्या वक्तव्याची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना गोयल म्हणाले की, राहुल गांधी यांची मागणी बिनबुडाची आहे. देशातील गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याऐवजी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणुकीतील आश्वासनांच्या पूर्ततेविषयी बोलावे, असाही टोला गोयल यांनी लगावला आहे.
 
आमचे सहकारी पक्षही विकासाभिमुख

भाजपचे सर्व सहकारी पक्ष हे विकासाभिमुख आहेत. देशाच्या वेगवान विकासाला त्यांचाही पाठींबा असून आर्थिक सुधारणांनाही त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकारी पक्षांसह भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय नक्कीच साध्य होईल, असाही विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे.