कोकणाने ठाकरेंना नाकारलं! नारायण राणे विजयी

    06-Jun-2024   
Total Views |

Narayan Rane 
 
बुधवार, ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीच्या निकालाचं पडघम वाजलं आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब झालं. तब्बल २९४ जागांवर एनडीएने आपला विजय निश्चित केला. तर राज्यात महायूतीने १७ आणि महाविकास आघाडीने ३० जागा मिळवत सरशी केलीये. मात्र, महायूतीच्या एका जागेची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा. या लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन टर्म खासदार असलेल्या उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा दारूण पराभव केलाय. उद्धव ठाकरेंना परंपरागत मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये यावेळी मतदारांनी का नाकारलं? आणि नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या या लढाईत राणेंनी कशी बाजी मारली याबद्दल जाणून घेऊया. 
 
महाराष्ट्रातील जनतेने नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पाहिलाय. उद्धव ठाकरेंमुळेच आपल्याला शिवसेना सोडावी लागली होती, असा आरोप नारायण राणे करत असतात. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा संघर्ष सुरू झाला. या संघर्षात दोन्ही बाजूंचा कधी विजय झाला तरी कधी पराभव. पण यावेळी हा राजकीय संघर्ष विकोपाला गेलाय. उबाठा गटाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून दोन टर्म खासदार असलेल्या विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात होते. मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ही लढाई राणे विरूद्ध राऊत असली अशी तरी खरी लढाई ही नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच होती. या लढाईचा निकाल कोकणात विशेषत: तळ कोकणात कुणाचं वर्चस्व आहे हे निश्चित करणार होता. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाईकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. दरम्यान, नारायण राणेंच्या विजयाने रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचं कमळ फुललंय.
 
तळ कोकण म्हटल्या जाणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग भागाची आपली एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इतिहास आणि राजकारण आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ प्रत्येक लोकसभा निवडणुकीवेळी चर्चेचा विषय असतो. यावेळी या लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध उबाठा अशी थेट लढत होती. या निवडणूकीत नारायण राणेंनी ४ लाख ४८ हजार ५१४ मतं घेत दणदणीत विजय मिळवलाय. तर विनायक राऊतांना ४ लाख ६५६ मतं मिळाली आहेत. म्हणजेच नारायण राणेंनी तब्बल ४७ हजार ८५८ मताधिक्याने लीड घेत विनायक राऊतांना म्हणजे एकप्रकारे उद्धव ठाकरेंनाच पराभूत केलंय.
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी चार जागांवर महायुतीचे आमदार आहेत. तर दोन जागांवर उबाठा गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे आमदार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा एकही आमदार नाहीये. त्यामुळं विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने पाहिल्यास या मतदारसंघात निश्चितच महायुतीचं पारडं जड होतं आणि याचाही फायदा नारायण राणेंना नक्कीच झालाय. शिवाय अमित शाह आणि राज ठाकरेंनी या मतदारसंघात नारायण राणेंसाठी घेतलेल्या प्रचार सभेचाही त्यांच्या विजयात मोलाचा वाटा असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. पण या सर्वांपेक्षाही जास्त नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे अशा संपूर्ण राणे कुटुंबाचा हा स्वत:चा असा विजय असल्याचं बोललं जातंय. गेली ४० वर्ष सिंधुदुर्गच्या जनतेसाठी नारायण राणेंनी केलेली सेवा आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती जनतेने मतदानाच्या माध्यमातून त्यांना दिलीये.
 
दुसरीकडे, २०१४ आणि २०१९ मध्ये एकसंघ शिवसेना आणि मोदी लाटेचा फायदा घेत विनायक राऊत या मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले. पण, यावेळचं राजकीय समिकरण पूर्णपणे बदललेलं होतं. उद्धव ठाकरेंनी मोदींची साथ सोडत काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत केलेली यूती आणि त्यांची भूमिका रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मतदारांना फारशी रुचली नसल्याने त्यांना हा फटका बसलाय. याशिवाय मतदारसंघातील रस्त्यांची दुराव्यवस्था, बारसूसारख्या मोठ्या प्रकल्पांना विरोध यामुळेसुद्धा कोकणातील जनतेने विनायक राऊतांना आणि प्रसंगी उद्धव ठाकरेंना नाकारलं असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....