"आमची निष्ठा NDA सोबत, नरेंद्र मोदीच आमचे पंतप्रधान" - पवन कल्याण

    06-Jun-2024
Total Views |
 pawan kalyan
 
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पार्टी, जनसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या एनडीए आघाडीला दणदणीत विजय मिळाला आहे. तेलुगू चित्रपटांचा सुपरस्टार अभिनेता आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी आपण एनडीएसोबत असल्याचे म्हटले आहे. या आघाडीने आंध्र प्रदेशात एकतर्फी विजयाची नोंद केली आहे.
 
पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने २ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती आणि पक्षाने दोन्ही जागा जिंकल्या आहेत. टीडीपीने १६ आणि भाजपने ३ लोकसभेच्या जागा जिंकल्या, तर विरोधी पक्ष वायएसआरसीपीने फक्त ४ जागा जिंकल्या. एका न्यूज चॅनलशी बोलताना, पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशात एनडीएची आघाडी अतूट असल्याचे स्पष्ट केले आहे. ते एनडीएपासून वेगळे होणार नाहीत.
 
पवन कल्याण म्हणाले की, एनडीएला पाठिंबा द्यावा किंवा न द्यावा असा कोणताही प्रश्न आमच्या मनात आला नाही. आम्ही फक्त एनडीएसोबत आहोत. सत्तेत योग्य वाटा उचलू, पण हे सर्व जनतेच्या हितासाठीच असेल, असे पवन कल्याण यांनी सांगितले. आपल्याला उपमुख्यमंत्री व्हायचे आहे का, असे विचारले असता पवन कल्याण म्हणाले की, एक-दोन दिवसांत चर्चा होईल. आंध्र प्रदेशमध्ये पवन कल्याणच्या जनसेना पक्षाने विधानसभेच्या २१ आणि लोकसभेच्या २ जागा लढवल्या होत्या.
  
सर्वसामान्यांचे कल्याण हेच आपले उद्दिष्ट असल्याचे पवन कल्याण यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना स्वत:साठी काहीही नको आहे, त्यांनी केवळ जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात प्रवेश केला आहे. यादरम्यान जगन मोहन रेड्डीसोबतच्या तणावाबाबत पवन कल्याण म्हणाले की, जगन मोहन रेड्डी यांच्याशी माझे कोणतेही वैर नाही. त्यांनी काहीही केले तरी जनतेने त्यांना धडा शिकवला आहे.